

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारातील घसरणीचा सिलसिला बुधवारीही कायम राहिला. आठवड्यातील सलग तिसऱ्या सत्रात बाजार लाल रंगात उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांमध्ये घसरण झाल्याने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1 लाख कोटी रुपयांची घट झाली.
बाजार सुरू होताच निफ्टी 43 अंकांनी घसरून 24,144 वर, तर सेन्सेक्स 206 अंकांनी घसरून 77,263 वर उघडला. याशिवाय बँक निफ्टी 116 अंकांच्या घसरणीसह 57,718 वर व्यवहार करत होता. मंगळवारीही बाजार दबावाखाली बंद झाला होता. काल निफ्टी 51 अंकांनी घसरून 24,187 वर, तर सेन्सेक्स 238 अंकांनी घसरून 77,470 वर स्थिरावला होता.
मंगळवारी अमेरिकन शेअर बाजारात चिप कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. त्यामुळं डाऊ जोन्स 385 अंकांनी, तर नॅस्डॅक 329 अंकांनी वाढून बंद झाला. या तेजीचा सकारात्मक परिणाम जपान आणि दक्षिण कोरियासारख्या आशियाई बाजारांवरही दिसून आला.
जपानचा निक्केई सुमारे 1.8 टक्क्यांनी, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक 5.5 टक्क्यांनी वाढला. जागतिक स्तरावर AI आणि चिप क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ होत असताना भारतीय बाजारात नफावसुली आणि इतर घटकांमुळे दबाव कायम राहिल्याचे दिसून आले.
बाजार तज्ज्ञांच्या मते, जागतिक घडामोडींमुळे आयटी क्षेत्रातील शेअर्सवर अल्पकालीन दबाव राहू शकतो. त्याउलट डेटा सेंटर, ऊर्जा आणि पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित कंपन्यांमध्ये खरेदीची संधी निर्माण होऊ शकते.
Hitachi Energy, GE Vernova, Cummins आणि ABB यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांपासून मर्यादित हालचाल दिसत होती. आता या शेअर्समध्ये पुनरागमनाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम बँकिंग क्षेत्रांवर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे बँक निफ्टीला 58,000 च्या वर टिकून राहणे कठीण जात आहे.
तांत्रिकदृष्ट्या 57,300 हा बँक निफ्टीसाठी महत्त्वाचा आधार (Support) मानला जात आहे. जोपर्यंत कच्च्या तेलाच्या किमती स्थिर होत नाहीत, तोपर्यंत सावध भूमिका घ्यावी, असा सल्ला विश्लेषकांनी दिला आहे.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (FII) कल सध्या ICICI बँकेकडे अधिक असल्याचे दिसत आहे. HDFC Bank चे निकाल अपेक्षेपेक्षा कमकुवत नसले तरी ICICI Bank ने तुलनेने चांगली कामगिरी केल्यामुळे FIIs कडून HDFC Bank मध्ये विक्री आणि ICICI Bank मध्ये खरेदी होत असल्याचे समोर आले आहे.
आयटी निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशी घसरला असून तो 28,984 या पातळीवर बंद झाला. गेल्या काही दिवसांत निर्देशांकाने 100 दिवसांच्या सरासरी (100 DMA) च्या वर जाण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येक वेळी तो त्या पातळीखालीच बंद झाला.
तज्ज्ञांच्या मते, 29,600 ते 30,000 ही आयटी निर्देशांकासाठी महत्त्वाची प्रतिकार (Resistance) पातळी आहे. या श्रेणीत नफावसुली करण्याचा सल्ला देण्यात येत असून, 30,250 च्या वर बंद झाल्यावरच नवीन तेजीचे स्पष्ट संकेत मिळू शकतात.
HDFC Securities चे बाजार विश्लेषक नंदीश शाह यांच्या मते, निफ्टीसाठी 24,530 ही तातडीची प्रतिकार पातळी, तर 24,000 हा महत्त्वाचा आधार आहे.
तर SAMCO Securities चे तांत्रिक विश्लेषक ओम मेहरा यांच्या मते, निफ्टीसाठी 24,100 हा तातडीचा सपोर्ट, तर 24,000 हा मजबूत आधार आहे. वरच्या बाजूला 24,280 आणि 24,370 या महत्त्वाच्या प्रतिकार पातळ्या असतील.
विश्लेषकांच्या मते, बँक निफ्टीसाठी 58,706 हा प्रमुख प्रतिकार, तर 57,200 आणि 57,000 हे महत्त्वाचे सपोर्ट स्तर आहेत. प्रमुख बँकांचे तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर भविष्यात बँकिंग निर्देशांकात मोठी तेजी येण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
(टीप : शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.)