Stock Market Today: शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स ५०० अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण

Stock Market Today: अमेरिका-इराण तणाव वाढल्यामुळे भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण झाली. सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला, तर निफ्टीत १५० अंकांची घसरण झाली.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या तणावाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला असून शुक्रवारी बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. अमेरिका इराण संघर्ष आणि हॉर्मुज सामुद्रधुनीतील वाढलेला तणाव यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याचा थेट फटका सेन्सेक्स आणि निफ्टीला बसला.

व्यवहाराच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स तब्बल ५०० अंकांनी घसरला, तर निफ्टीतही १५० अंकांची घसरण झाली. बँक निफ्टी सुमारे ३५० अंकांनी खाली आला. ऑटो आणि खासगी बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात नफा-वसुली दिसून आली.

सकाळी ९.२५ वाजता सेन्सेक्स ३६५ अंकांच्या घसरणीसह ७७,४८१ वर व्यवहार करत होता. दिवसभरातील नीचांकी पातळी ७७,२९१ इतकी नोंदली गेली. निफ्टी १०२ अंकांनी घसरून २४,२२४ वर व्यवहार करत होता. त्याने २४,१५८ हा इंट्राडे लो गाठला. बँक निफ्टी ३६६ अंकांनी खाली येत ५५,६७९ वर पोहोचला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी थोडासा सावरण्याचा प्रयत्न केला. फार्मा, FMCG आणि IT क्षेत्रातील काही शेअर्समध्ये किरकोळ वाढ दिसली.

कोणते शेअर्स तेजीत, कोणते घसरले?

निफ्टी ५० मध्ये Apollo Hospital चा शेअर सुमारे २ टक्क्यांनी वाढून सर्वाधिक तेजीत होता. याशिवाय Asian Paints, Tech Mahindra, HCL Tech, BEL, Tata Consumer आणि Infosys या शेअर्समध्येही वाढ दिसली.

दुसरीकडे Coal India, Axis Bank, HDFC Bank, Hindalco, M&M आणि Eternal या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

अमेरिका-इराण संघर्षामुळे बाजार हादरला

हॉर्मुज सामुद्रधुनीत अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव अधिक वाढल्याने जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ल्याचे आरोप केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला लवकर करार करण्याचं आवाहनही केलं आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढल्या

या तणावाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या बाजारावर झाला. ब्रेंट क्रूडची किंमत पुन्हा १०२ डॉलर प्रति बॅरलच्या वर गेली. सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर तेलाच्या किंमतीत आलेली ही तेजी भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांसाठी चिंतेची बाब मानली जात आहे.

जागतिक बाजारावर दबाव

Gift Nifty सुमारे १०० अंकांनी घसरून २४,३०० च्या आसपास व्यवहार करत होता. जपान आणि दक्षिण कोरियाच्या बाजारांवरही दबाव दिसून आला. अमेरिकन बाजारातही मोठे चढ-उतार दिसले. Nasdaqमध्ये विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर घसरण झाली, तर Dow Jones सुमारे ३०० अंकांनी घसरणीसह बंद झाला.

सोन्या-चांदीत जोरदार तेजी

जागतिक तणाव वाढल्यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीकडे मोर्चा वळवला. त्यामुळे सोन्या आणि चांदीच्या किंमतीत जोरदार वाढ झाली. चांदी तब्बल ५,३०० रुपयांनी वाढून २,५८,५४० रुपये प्रति किलोवर पोहोचली. सोन्याची किंमतही वाढून १,५२,३०० रुपयांच्या आसपास गेली.

परदेशी गुंतवणूकदारांची विक्री कायम

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सलग तिसऱ्या दिवशी विक्री सुरू ठेवली. FIIs ने रोखीच्या बाजारात ३४१ कोटी रुपयांची विक्री केली. तर एकूण नेट विक्री सुमारे ३,२५० कोटी रुपयांची झाली. मात्र, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी खरेदी सुरू ठेवत ४४१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

Stock Market Today
LPG New Rule: तुमचा सिलेंडर सरेंडर करा... तुम्हाला पण असा मेसेज आलाय का? LPGचे नियम बदलले

आज कोणत्या कंपन्यांच्या निकालांकडे लक्ष?

आज Titan, SBI आणि Tata Consumer यांच्या तिमाही निकालांवर गुंतवणूकदारांची नजर असेल. तसेच ABB, MCX, Bank of Baroda, Bank of India आणि Swiggy यांसारख्या कंपन्यांचे निकालही जाहीर होणार आहेत.

Stock Market Today
Big Tax Changes: नवीन नियम लागू! हा फॉर्म लवकर भरावा लागणार; नाहीतर तुमच्या खात्यातून सरकार पैसे कापणार

दरम्यान, OnEMI Technology Solutions या कंपनीचा IPO आज शेअर बाजारात लिस्ट होणार असून गुंतवणूकदारांचं त्याकडे विशेष लक्ष आहे. तसेच आयवेअर कंपनी Lenskart मध्ये सुमारे ३,३०० कोटी रुपयांची मोठी ब्लॉक डील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news