

Stock Market Today
फायनान्सियल शेअर्समध्ये विक्री, कंपन्यांच्या तिमाही कमाईचे कमकुवत आकडे आणि सावध जागतिक भावनेचा परिणाम शुक्रवारी (दि. १८ जुलै) भारतीय शेअर बाजारात दिसून आला. सेन्सेक्स ५०१ अंकांनी घसरून ८१,७५७ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १४३ अंकांनी घसरून २४,९६८ पर्यंत खाली आला.
बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल शुक्रवारी २.५ लाख कोटींनी कमी होऊन ४५८.३० लाख कोटींपर्यंत खाली आले. १७ जुलै रोजी ते ४६०.८७ लाख कोटी रुपयांवर होते.
जून तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर ॲक्सिस बँकेचा शेअर्स तब्बल ५.२ टक्क्यांनी घसरला. त्याचबरोबर भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, कोटक बँक, टेक महिंद्रा हे शेअर्स १ ते २ टक्के घसरले. तर दुसरीकडे बजाज फायनान्स, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक हे शेअर्स वाढून बंद झाले.
निफ्टी बँक आणि फायनान्सियल निर्देशांक प्रत्येकी जवळपास १ टक्के घसरले. निफ्टी एफएमसीजी ०.६ टक्के घसरून बंद झाला.
टीसीएस सारख्या आयटी कंपन्यांच्या कमाईचे आकडे गुंतवणूकदारांच्या भावना उंचावू शकले नाहीत. टीसीएसचा शेअर्स आज ०.८ टक्के घसरला. तर दुसरीकडे विप्रोचा शेअर्स २.२ टक्के वाढला.
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून विक्री सुरुच आहे. त्यांनी गुरुवारी ३,६९४ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.
आशियाई बाजारातही आज कमकुवत स्थिती दिसून आले. याचा दबावही भारतीय बाजारात दिसून आला.