Stock Market Crash: शेअर बाजारात मोठा भूकंप! अमेरिका-इराण संघर्षाचा फटका; सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला

Stock Market Crash: अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली.
Stock Market Crash
Stock Market CrashPudhari
Published on
Updated on

Stock Market Crash: अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावाचा परिणाम सोमवारी भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. आठवड्याच्या पहिल्याच व्यवहारात बाजाराने मोठ्या घसरणीसह सुरुवात केली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा (BSE) सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी घसरला, तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा (NSE) निफ्टी 24 हजारांच्या जवळ पोहोचला. मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर झाला.

सेन्सेक्स-निफ्टीची घसरण

शुक्रवारी 77,569 अंकांवर बंद झालेला सेन्सेक्स सोमवारी 76,963 अंकांवर उघडला. त्यानंतर काही मिनिटांतच तो 700 हून अधिक अंकांनी घसरून 76,857 च्या आसपास पोहोचला. दुसरीकडे, शुक्रवारी 24,206 वर बंद झालेला निफ्टी 24,039 वर उघडल्यानंतर 200 अंकांहून अधिक घसरून 24,000 च्या पातळीवर आला.

मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा जोर

बाजारातील घसरणीचा फटका अनेक आघाडीच्या कंपन्यांच्या शेअर्सना बसला. इंडिगोचे शेअर्स सुमारे 2.5 टक्क्यांनी घसरले, तर टाटा स्टीलमध्ये 2.35 टक्के, मारुती सुझुकीमध्ये 2 टक्के आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये 1.6 टक्क्यांची घसरण झाली.

मिडकॅप शेअर्समध्येही मोठी विक्री दिसून आली. मुथूट फायनान्स, अशोक लेलँड, कोफोर्ज आणि एचपीसीएलसारख्या कंपन्यांचे शेअर्सही 1.5 ते 2.5 टक्क्यांपर्यंत घसरले.

बाजारावर दबाव आणणारे प्रमुख घटक

सध्या कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 80 डॉलरच्या धोकादायक पातळीच्या जवळ पोहोचल्या आहेत. अमेरिका-इराण संघर्ष तीव्र झाल्याने जागतिक बाजारात अनिश्चितता वाढली आहे. आशियाई बाजार आणि डाऊ फ्युचर्समध्येही मोठी घसरण दिसून येत आहे. याशिवाय मान्सूनचा वेग मंदावल्यानेही गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

काही सकारात्मक संकेत

घसरणीच्या वातावरणातही काही बाबी बाजारासाठी सकारात्मक मानल्या जात आहेत. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FII) सातत्याने खरेदी होत आहे. देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडूनही बाजाराला चांगला पाठिंबा मिळत आहे. रुपयामध्येही अलीकडच्या नीचांकी पातळीवरून सुधारणा झाली आहे. तसेच आयटी कंपन्यांचे तिमाही निकाल आतापर्यंत समाधानकारक असल्याने या क्षेत्राबाबत सकारात्मक भावना कायम आहेत.

Stock Market Crash
Post Office Scheme: फक्त एक काम करा... तुम्हाला सरकारी योजनेत मिळतील 16 लाख रुपये, काय आहे योजना?

निफ्टीसाठी महत्त्वाचे स्तर कोणते?

तज्ज्ञांच्या मते, निफ्टीने 24,000 ची पातळी कायम ठेवली नाही तर तो 23,817 ते 23,650 या पातळीपर्यंत घसरू शकतो. दुसरीकडे, 24,521 चा अलीकडील उच्चांक पार केल्यास बाजारात पुन्हा खरेदीचा वेग वाढण्याची शक्यता आहे आणि निफ्टी 24,750 पर्यंत जाऊ शकतो.

एसबीआय सिक्युरिटीजच्या मते, 24,500 ते 24,550 हा निफ्टीसाठी मजबूत प्रतिकाराचा स्तर आहे, तर 23,950 ते 23,900 हा महत्त्वाचा सपोर्ट झोन आहे. या पातळ्यांच्या वर किंवा खाली बाजार गेल्यास पुढील दिशा स्पष्ट होईल.

कोणत्या गोष्टींवर बाजाराची नजर?

पुढील काही दिवसांत अमेरिका-इराण संघर्षातील घडामोडी, होर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थिती, कच्च्या तेलाच्या किंमती, कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल, रुपयाची हालचाल आणि मान्सूनची प्रगती या घटकांवर बाजाराची दिशा अवलंबून राहणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेण्याचा सल्ला विश्लेषक देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news