

Stock Market Closing Updates
शेअर बाजारात मंगळवारी (दि. २२ जुलै) चढ-उतार राहिला. सेन्सेक्स १३ अंकांच्या किरकोळ घसरसणीसह ८२,१८६ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक २९ अंकांनी घसरून २५,०६० वर स्थिरावला. फूड डिलिव्हरी क्षेत्रातील झोमॅटोची मूळ कंपनी इटरनलच्या शेअर्समध्ये तुफान तेजी दिसून आली. तसेच फायनान्सियल शेअर्समध्येही मजबुती कायम राहिली. पण रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या हेवीवेट शेअर्समध्ये झालेली घसरण आणि आयटी शेअर्समधील कमकुवतपणामुळे बाजारातील वाढ मर्यादित राहिली.
आजच्या सत्रात सेन्सेक्सवर इटरनलचा शेअर्सने (Eternal Share Price Zomato) तब्बल १५ टक्के वाढून ३११ रुपयांवर गेला. या शेअर्सचा हा विक्रमी उच्चांक आहे. त्यानंतर हा शेअर्स १०.५ टक्के वाढीसह २९९ रुपयांवर बंद झाला. गेल्या दोन दिवसांत हा शेअर्स २० टक्क्यांहून अधिक वाढला आहे. जून २०२५ तिमाहीत कंपनीच्या महसूल आणि नफ्यात मोठी वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर इटरनल शेअर्स वधारला आहे.
यामुळे इटरनलचे बाजार भांडवल ३ लाख कोटी रुपयांपर्यंत गेले. यात इटरनलने विप्रो, टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, नेस्ले इंडिया आणि एशियन पेंट्सला मागे टाकले आहे.
त्याचबरोबर सेन्सेक्सवर टायटन, भारत इलेक्ट्रॉनिक्स, मारुती, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, एम अँड एम हे शेअर्सही तेजीत राहिले. तर दुसरीकडे टाटा मोटर्सचा शेअर्स २ टक्के, अदानी पोर्ट्सचा शेअर्स १.९ टक्के घसरला. एसबीआय, रिलायन्स, एलटी हे शेअर्सही प्रत्येकी १ टक्के घसरले.
फार्मा आणि रियल्टी शेअर्समध्ये घसरण झाली. हे दोन्ही निर्देशांक प्रत्येकी १ टक्के घसरले. निफ्टी आयटीदेखील ०.४ टक्के घसरला. बीएसई मिडकॅप ०.६ टक्के आणि स्मॉलकॅप ०.१ टक्के घसरणीसह बंद झाला.