Credit Card | क्रेडिट कार्ड अर्ज वारंवार का नाकारले जातात?

शॉपिंगपासून ते आपत्कालीन खर्चापर्यंत, क्रेडिट कार्डचा वापर सर्वत्र वाढला आहे
why-credit-card-applications-get-rejected-frequently
Credit Card | क्रेडिट कार्ड अर्ज वारंवार का नाकारले जातात?Pudhari File Photo
Published on
Updated on

मारुती वि. पाटील

आजच्या डिजिटल युगात क्रेडिट कार्ड हे केवळ लक्झरी नसून, गरजेचे आर्थिक साधनही बनले आहे. शॉपिंगपासून ते आपत्कालीन खर्चापर्यंत, क्रेडिट कार्डचा वापर सर्वत्र वाढला आहे. मात्र, अनेकदा नागरिकांचा क्रेडिट कार्डसाठीचा अर्ज बँकेकडून वारंवार नाकारला जातो. हे नेमके का घडते, याची कारणे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

खराब क्रेडिट स्कोअर (सिबिल स्कोअर)

क्रेडिट कार्ड अर्ज नाकारण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे, खराब क्रेडिट स्कोअर. सिबिल किंवा इतर क्रेडिट ब्युरोचा स्कोअर 750 पेक्षा कमी असल्यास, बँका किंवा वित्तीय संस्था त्या अर्जदारावर विश्वास ठेवत नाहीत. वेळेवर कर्ज किंवा क्रेडिट कार्डचे बिल न भरल्यास आपला स्कोअर कमी होतो आणि परिणामी अर्ज नाकारला जातो.

जास्त कर्जाचे ओझे

जर तुमच्यावर आधीच अनेक कर्जे किंवा ईएमआय असतील, तर बँक तुमचा अर्ज नाकारू शकते. कारण, जास्त कर्ज असलेल्या व्यक्तीला नवीन कर्ज फेडणे कठीण जाऊ शकते, असा बँकेचा अंदाज असतो. DTI (Debt-to-Income Ratio) जास्त असल्यास, क्रेडिट कार्ड मिळण्याची शक्यता कमी होते.

स्थिर उत्पन्नाचा अभाव

क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी नियमित आणि स्थिर उत्पन्न असणे आवश्यक आहे. फ्रीलान्सिंग, कंत्राटी नोकरी किंवा उत्पन्नाचा निश्चित पुरावा नसल्यास, बँका अर्ज नाकारतात. कारण, उत्पन्नाची अनिश्चितता असल्यास कर्ज फेडण्याची क्षमता कमी असते.

चुकीची किंवा अपूर्ण माहिती

अर्जात चुकीची माहिती, अपूर्ण कागदपत्रे किंवा पत्त्याचा गोंधळ असल्यासही अर्ज नाकारला जाऊ शकतो. अर्ज करताना सर्व माहिती अचूक आणि पूर्ण द्यावी.

वय किंवा नोकरीतील स्थैर्य

काही वेळा वयाची अट पूर्ण न झाल्यास किंवा नोकरीत सातत्य नसेल, तरीही अर्ज नाकारला जाऊ शकतो. बँका अर्जदाराची नोकरीतील स्थिरता आणि अनुभव पाहतात.

काय करावे?

कमी झालेला क्रेडिट स्कोअर काही सोप्या आणि शिस्तबद्ध उपायांनी सुधारता येतो.

हप्ते वेळेवर आणि पूर्ण भरा : तुमचा क्रेडिट स्कोअर ठरवण्यात कर्जाचे हप्ते (ईएमआय) आणि क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरणे, हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. एक जरी हप्ता चुकला तरी त्याचा थेट परिणाम तुमच्या स्कोअरवर होतो. अनेकजण क्रेडिट कार्डचे फक्त‘किमान देयक’ (Minimum Amount Due) भरतात; पण ही सवय धोकादायक आहे. नेहमी संपूर्ण बिल वेळेवर भरण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा स्कोअरही मजबूत होतो.

क्रेडिट लिमिटचा वापर जपून करा :

तुमच्या क्रेडिट कार्डची एकूण लिमिट आणि तुम्ही वापरलेली रक्कम यांच्या गुणोत्तराला ‘क्रेडिट युटिलायझेशन रेशो’ म्हणतात. सोप्या भाषेत, जर तुमच्या कार्डची लिमिट 1 लाख रुपये असेल आणि तुम्ही त्यावर सतत 80-90 हजार रुपये खर्च करत असाल, तर तुम्ही कर्जावर जास्त अवलंबून आहात, असे मानले जाते. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, हा रेशो नेहमी 30% पेक्षा कमी असावा.

प्रत्येक खरेदीचे ईएमआयमध्ये रूपांतर टाळा : आजकाल ‘नो-कॉस्ट ईएमआय’च्या आकर्षक योजनांमुळे आपण लहान-सहान वस्तूही हप्त्यांवर घेतो. हे सोयीचे असले, तरी एकाच वेळी अनेक कर्ज (ईएमआय) सुरू असणे तुमच्या क्रेडिट रिपोर्टसाठी चांगले नाही. त्यामुळे फक्तअत्यंत आवश्यक आणि मोठ्या खरेदीसाठीच ईएमआयचा पर्याय निवडा. छोट्या-मोठ्या खर्चासाठी ईएमआय टाळणे केव्हाही उत्तम.

छोट्या कर्जांनी क्रेडिट स्कोअर तयार करा : ज्यांनी आजपर्यंत कधीच कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेतलेले नाही, त्यांचा कोणताही क्रेडिट इतिहास नसतो. अशावेळी त्यांना कर्ज मिळण्यास अडचण येऊ शकते. अशा व्यक्तींनी आपला स्कोअर तयार करण्यासाठी एखादे छोटे कर्ज (उदा. मोबाईल किंवा फ्रीजसाठी कन्झ्युमर ड्युरेबल लोन) किंवा एफडीवर (फिक्स्ड डिपॉझिट) आधारित सुरक्षित क्रेडिट कार्ड घ्यावे. त्याचे हप्ते वेळेवर भरल्यास तुमचा एक सकारात्मक क्रेडिट इतिहास तयार होतो आणि स्कोअर वाढू लागतो.

थकीत कर्जांना हुशारीने हाताळा :

जर तुमचे काही हप्ते आधीच थकले असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशावेळी थेट बँकेशी संपर्क साधा आणि कर्ज फेडण्यासाठी मार्ग काढा. बँक तुम्हाला कर्जाची पुनर्रचना किंवा एकरकमी परतफेड (वन टाईम सेटलमेंट) असे पर्याय देऊ शकते. ‘सेटलमेंट’ केल्यास तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर तशी नोंद होते; पण कर्ज ‘राईट-ऑफ’ होण्यापेक्षा किंवा डिफॉल्टर ठरण्यापेक्षा हे केव्हाही चांगले आहे. जास्त व्याज असलेली कर्जे (उदा. क्रेडिट कार्ड) आधी फेडण्याला प्राधान्य द्या.

तुमचा क्रेडिट स्कोअर तुमच्या आर्थिक आरोग्याचा पासपोर्ट आहे. तो चांगला ठेवणे म्हणजे भविष्यातील आर्थिक गरजांसाठी एक भक्कम पाया तयार करणे.

वर दिलेले उपाय जरी सोपे असले,तरी त्यासाठी आर्थिक शिस्त आणि सातत्य आवश्यक आहे. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल, तर केवळ कर्जच नाही, तर आर्थिक आत्मविश्वासही वाढतो. अर्ज नाकारला गेला, तर घाबरू नका; कारणे समजून घेऊन योग्य तयारी आणि आर्थिक शिस्त पाळल्यास, पुढील वेळी तुमचा अर्ज निश्चितच मंजूर होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news