

Stock Market Closing Updates
जागतिक बाजारातून कमकुवत संकेत, कच्च्या तेलाच्या दरातील वाढ आणि परदेशी गुंतवणूकदारांनी सुरु केलेल्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात मंगळवारी (दि.३ जून) घसरण दिसून आली. परिणामी, सेन्सेक्स (Sensex) ६३६ अंकांनी घसरून ८०,७३७ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक (Nifty 50) १७४ अंकांच्या घसरणीसह २४,५४२ वर बंद झाला.
आजच्या सत्रात सर्वाधिक घसरण पॉवर, कॅपिटल गुड्स, युटिलिटी शेअर्समध्ये दिसून आली. निफ्टी ५० वर (Nifty 50) अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायजेस, कोल इंडिया, बजाज फिनसर्व्ह, पॉवर ग्रिड हे शेअर्स १ ते २ टक्के घसरले.
दरम्यान, बीएसई मिडकॅप ०.५ टक्के घसरला. तर स्मॉलकॅप निर्देशांक सपाट पातळीवर स्थिरावला.
सेन्सेक्सवर एम अँड एमचा शेअर्स वगळता ३० पैकी २९ शेअर्स लाल रंगात बंद झाले. अदानी पोर्ट्सचा शेअर्स २.४ टक्के घसरणीसह टॉप लूजर ठरला. त्याचबरोबर बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, पॉवर ग्रिड, इटर्नल, इंडसइंड बँक, मारुती, एनटीपीसी, टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट, ॲक्सिस बँक, टाटा मोटर्स, टाटा स्टील, एलटी हे शेअर्स १ ते १.७५ टक्क्यांपर्यंत घसरले.
बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३ जून रोजी २.४० लाख कोटींनी कमी होऊन ४४३.१० लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले. २ जून रोजी बाजार भांडवल ४४५.५० लाख कोटी रुपये होते. याचाच अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज २.४० लाख कोटींची घट झाली.
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात विक्री करुन पैसे काढून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी सोमवारी एका दिवसात २,५८९ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. यामुळे बाजारात दबाव वाढला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडचा भाव ०.५७ टक्के वाढून प्रति बॅरल ८५ डॉलरवर पोहोचला आहे. पेट्रोलियम उत्पादक देशांची संघटना ओपेक+ ने उत्पादनात काही प्रमाणात वाढ केली आहे. भारतात एकूण मागणीच्या ८५ टक्के कच्च्या तेलाची आयात केली जाते.
भू-राजकीय तणाव वाढल्याचे पडसाद बाजारात दिसून आले आहेत. पूर्व युरोप आणि पश्चिम आशियात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमेरिका आणि चीन यांच्यात पुन्हा एकदा व्यापारी तणाव वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर टॅरिफ मागे घेण्याच्या समझोता कराराचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याचदरम्यान, अमेरिकेने स्टील आणि ॲल्युमिनियमवरील टॅरिफ दुपटीने वाढवून ते ५० टक्के करण्याची योजना आखली आहे. यामुळे जागतिक पातळीवर व्यापार युद्धाची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा दबाव बाजारात दिसून आला.