
Stock Market Closing Updates
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची व्याजदराबाबत सावधगिरीची भूमिका आणि मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावना कमकुवत झाल्या. परिणामी, गुरुवारी (दि. १९ जून) भारतीय इक्विटी बेंचमार्क सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात बंद झाले. सेन्सेक्स ८२ अंकांनी घसरून ८१,३८१ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १८ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २४,७९३ वर स्थिरावला.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने बुधवारी व्याजदरात कोणताही बदल केला नाही. त्यांनी व्याजदर ४.२५ ते ते ४.५० टक्क्यांच्या श्रेणीत जैसे थे ठेवला. याचाच अर्थ असा की कर्जाच्या हप्त्यात (EMI) कोणताही बदल होणार नाही. यातून सततच्या महागाई वाढीची चिंता दिसून येते. या पार्श्वभूमीवर आज भारतीय आयटी कंपन्यांचे शेअर्स ३ टक्क्यांपर्यंत घसरले. निफ्टी आयटी १ टक्के घसरला. निफ्टी आयटीवर ओएफएसएसचा शेअर्स ३.३८ टक्के, कोफोर्ज, पर्सिस्टंट २ टक्के, टेक महिंद्रा १.९ टक्के आणि LTIMindtree चा शेअर्स १.८ टक्के घसरला.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार विक्री दिसून आली. बीएसई मिडकॅप १.६ टक्के आणि स्मॉलकॅप १.७ टक्के घसरून बंद झाला. ऑटो वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज घसरणीसह बंद झाले. मेटल, रियल्टी, ऑईल अँड गॅस, फार्मा, टेलिकॉम आणि पीएसयू बँक हे निर्देशांक ०.५ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले.
सेन्सेक्सवर अदानी पोर्ट्सचा शेअर्स २.५ टक्के, बजाज फायनान्स २ टक्के घसरला. त्याचबरोबर टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, नेस्ले इंडिया, एसबीआय, इन्फोसिस, एनटीपीसी, टीसीएस, टाटा स्टील हे शेअर्सही घसरले. तर एम अँड एम, टायटन, एलटी, भारती एअरटेल, मारुती, इटर्नल हे शेअर्स तेजीत राहिले.