

Stock Market Closing Updates
अमेरिकेतील बाँड उत्पन्नात वाढ आणि त्यांच्या कर्जाच्या वाढत्या ओझ्याबद्दलची चिंता गुरुवारी भारतीय शेअर बाजारात दिसून आली. बाजारात आज चौफेर विक्री राहिली. परिणामी, सेन्सेक्स- निफ्टी घसरले. सेन्सेक्स ६४४ अंकांनी घसरून ८०,९५१ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक २०३ अंकांनी घसरून २४,६०९ पर्यंत खाली आला. आजच्या ट्रेडिंग सत्रात रिलायन्ससह फायनान्सियल आणि आयटी शेअर्सवर अधिक दबाव राहिला.
क्षेत्रीय पातळीवर निफ्टी ऑटो, एफएमसीजी, आयटी, फार्मा, कन्झ्यूमर ड्युराबेल्स आणि ऑईल अँड गॅस निर्देशांक १ ते १.५ टक्क्यांपर्यंत घसरले. निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्सियलमध्येही काही प्रमाणात घसरण दिसून आली. बीएसई मिडकॅप ०.३ टक्के घसरला. तर स्मॉलकॅप सपाट पातळीवर स्थिरावला.
आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका बसला. आज २२ मे रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४३९.०९ लाख कोटींपर्यंत खाली आले. ते २१ मे रोजी ४४१.१८ लाख कोटी होते. याचाच अर्थ आज बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात २.०९ लाख कोटींची घट झाली.
सेन्सेक्सवर एम अँड एमचा शेअर्स २.५ टक्के वाढला. त्याचबरोबर बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, पॉवर ग्रिड, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स, एनटीपीसी, मारुती, टीसीएस, नेस्ले इंडिया, टाटा मोटर्स, इन्फोसिस, एलटी हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले. तर दुसरीकडे इंडसइंड बँकेचा शेअर्स १.८ टक्के वाढून बंद झाला. भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्सही हिरव्या रंगात बंद झाले. सेन्सेक्सवरील एकूण ३० पैकी २७ शेअर्स घसरले. तर केवळ ३ शेअर्स तेजीत राहिले.
अमेरिकेतील बाँड यिल्डमध्ये वाढ आणि जागतिक बाजारातील विक्रीमुळे गुंतवणूकदारांच्या भावना कमकुवत झाल्या. यूएस ट्रेझरी यिल्ड्स १८ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचले. तर ३० वर्षांच्या ट्रेझरी बाँड्सवरील यिल्डही दीड वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. अमेरिकेतील बाँड यिल्डमध्ये वाढ झाल्यामुळे भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठावर याचा परिणाम होतो, असे बाजारातील विश्लेषकांचे म्हणणे आहे.