

Stock Market Updates
मुंबई : भारतीय शेअर बाजारातील सात सत्रांतील तेजीला गुरुवारी (दि.२४) ब्रेक लागला. सेन्सेक्स ३१५ अंकांनी घसरून ७९,८०१ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक (Nifty 50) ८२ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २४,२४६ वर स्थिरावला.
गेल्या दिवसांच्या तेजीनंतर आजच्या सत्रात काही प्रमाणात प्रॉफिट बुकिंग दिसून आले. विशेषतः फायनान्सियल आणि आयटी शेअर्सवर दबाव राहिला.
गेल्या सात सत्रांत बाजारात तेजी राहिली होती. पण आजच्या सत्राची सुरुवात घसरणीने झाली. आशियाई बाजारांमधील कमकुवत संकेत पाहता गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंग केल्याचे दिसून आले.
सेन्सेक्सवर हिंदुस्तान युनिलिव्हरचा शेअर्स ४ टक्के घसरला. त्याचबरोबर भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, Eternal, एम अँड एम, एचसीएल टेक हे शेअर्सही घसरले. तर इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा हे शेअर्स १ ते ३ टक्के वाढले.
फायनान्सियल आणि आयटी शेअर्सवर आज दबाव दिसून आला. आजच्या सत्रात सर्व क्षेत्रात विक्री राहिली. निफ्टी फार्मा निर्देशांक १ टक्के वाढला. तर एफएमसीजी आणि रियल्टी निर्देशांक १ टक्के घसरला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप जवळपास सपाट पातळीवर बंद झाले.
भारतीय बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम राहिला आहे. एनएसईच्या आकडेवारीनुसार, बुधवारी परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) ३,३३२ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी १,२३४ कोटींच्या शेअर्सची विक्री केली. या पार्श्वभूमीवर बाजारातील घसरण मर्यादित राहिली.