

भारतामध्ये डिजिटल व्यवहाराचे स्वरूप बदलण्यामध्ये ‘गुगल पे’ने मोठे योगदान दिले आहे. आता रूपे क्रेडिट कार्डधारक देखील गुगल पे (Google Pay) वापरून यूपीआय व्यवहार करू शकतात.
गुगल पे वापरून यूपीआय व्यवहार ही सुविधा यापूर्वी फक्त डेबिट कार्डापुरती मर्यादित होती; पण आता क्रेडिट कार्डद्वारेही सोप्या, जलद आणि सुरक्षित पद्धतीने व्यवहार करता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे छोट्या दुकानांपासून ऑनलाईन शॉपिंगपर्यंत सर्व ठिकाणी पेमेंट करणे पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरू झालेल्या या सुविधेमुळे डिजिटल समावेशकतेला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
मार्च 2025 मध्ये यूपीआय व्यवहारांचा एकूण आकडा 24.77 लाख कोटी रुपये इतका झाला असून, तो फेब्रुवारीच्या तुलनेत 12.7 टक्क्यांनी अधिक आहे. गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ 25 टक्के इतकी आहे, जी भारतातील डिजिटल व्यवहारांवरील वाढता विश्वास दर्शवते.
रूपे क्रेडिट कार्ड देशातील स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, पंजाब नॅशनल बँक (आणि अॅक्सिस बँक) यांसारख्या प्रमुख बँकांसोबतच अनेक प्रादेशिक व सहकारी बँकांकडून जारी केली जात आहेत. ही सुविधा ग्राहकांना केवळ सोपे पेमेंट करण्याची संधी देत नाही, तर बँकांकडून मिळणार्या सवलती, कॅशबॅक आणि रिवॉर्डस्चा लाभ घेण्याचीही संधी देते.
रूपे क्रेडिट कार्डला गुगल पे शी जोडणे अत्यंत सोपे आहे. त्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गुगल पे अॅप उघडा. त्यानंतर प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करून ‘पेमेंट मेथडस्’ मध्ये जा. येथे ‘अॅड रूपे क्रेडिट कार्ड ’ हा पर्याय निवडा. त्यानंतर तुमच्या बँकेचे नाव निवडून कार्ड नंबर, सीव्हीव्ही आणि एक्सपायरी डेट भरावी लागेल. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल, जो टाकून कार्डची खातरजमा करावी लागेल. शेवटी एक यूपीआय पिन सेट करावा लागेल. यामुळे प्रत्येक व्यवहार सुरक्षित राहील.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे कार्ड गुगल पे शी जोडले जाईल. आता तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करून यूपीआय आयडी टाकून किंवा मर्चंट हँडल वापरून व्यवहार करू शकता. ही सुविधा केवळ अॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच नव्हे, तर स्थानिक किराणा दुकाने, रिटेल स्टोअर्स आणि मोठ्या मॉल्समध्येही वापरता येते. यामुळे क्रेडिट कार्ड सतत सोबत बाळगण्याची गरज राहणार नाही.
असे असले तरी 2025 मध्ये गुगल पे ने क्रेडिट कार्डद्वारे बिल पेमेंट करताना 0.5 ते 1 टक्क्यांपर्यंतचे सुविधा शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये जीएसटीचाही समावेश आहे. हे शुल्क व्यवहाराच्या प्रकारानुसार बदलते. विशेषतः मोठे व्यवहार करणारे ग्राहक आता रिवॉर्डस् आणि शुल्क यामध्ये तुलना करत आहेत. तरीदेखील बँक खात्यातून यूपीआय व्यवहार हे अद्यापही मोफत आहेत. त्यामुळे सामान्य लोकांसाठी ही सुविधा अधिक आकर्षक ठरते. डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात भारत वेगाने पुढे जात आहे. गुगल पे आणि रूपे क्रेडिट कार्ड यांची ही भागीदारी देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी आहे.
रूपे क्रेडिट कार्डला ‘गुगल पे’शी जोडल्याने अनेक फायदे मिळतात. हे केवळ त्वरित व्यवहारांना मदत करत नाही, तर बँकांकडून मिळणार्या खास सवलती आणि कॅशबॅकसुद्धा मिळू शकतात. छोट्या दुकानांपासून मोठ्या ऑनलाईन स्टोअर्सपर्यंत सर्वत्र या सुविधेचा वापर शक्य आहे. शिवाय, आरबीआयच्या डिजिटल समावेशनाच्या उद्दिष्टांनाही यामुळे मदत होणार आहे.