

Stock Market Closing Updates
भारतीय शेअर बाजारात सोमवारी (दि. २ जून) जोरदार रिकव्हरी दिसून आली. सकाळच्या सुरुवातीच्या ७०० अंकांच्या घसरणीतून सावरत सेन्सेक्स सपाट पातळीवर स्थिरावला. सेन्सेक्स ७७ अंकांनी घसरून ८१,३७३ वर, तर निफ्टी ५० निर्देशांक ३४ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २४, ७१६ वर स्थिरावला.
अमेरिकेच्या टॅरिफबाबतच्या अनिश्चिततेचा फटका आयटी आणि मेटल शेअर्संना बसला. परिणामी, निफ्टी आयटी आणि निफ्टी मेटल प्रत्येकी ०.७ टक्के घसरले. तर दुसरीकडे रियल्टी, एफएमसीजी शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. दरम्यान, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सची कामगिरी चांगली राहिली. बीएसई मिडकॅप ०.५ टक्के आणि स्मॉलकॅप ०.३ टक्के वाढून बंद झाला.
अमेरिका-चीन व्यापार तणाव आणि अमेरिकेच्या रोजगाराच्या आकडेवारीपूर्वी भारतीय शेअर बाजारात सुरुवातीला दबावाचे वातावरण राहिले. पण त्यानंतर बाजार सावरला. आथिक वर्ष २०२४- २०२५ च्या अखेरच्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) भारतीय अर्थव्यवस्थेने दमदार कामगिरी केल्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या मार्च तिमाहीत देशातील जीडीपी वाढ ७.४ टक्के राहिला होती.
बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल २ जून रोजी सुमारे १ लाख कोटी रुपयांनी वाढून ४४५.२४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. ३० मे रोज ते ४४४.१९ लाख कोटी रुपये होते.
सेन्सेक्सवर टेक महिंद्रा, टाटा स्टील, टाटा मोटर्स, टायटन, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, इन्फोसिस, कोटक बँक, बजाज फायनान्स हे शेअर्स ०.५ ते १.५ टक्क्यांपर्यंत घसरले. तर अदानी पोर्ट्स, एम अँड एम, पॉवर ग्रिड, इटर्नल, हिंदुस्तान युनिलिव्हर हे १ ते २.५ टक्क्यांपर्यंत वाढले.