

Stock Market Closing Updates
मुंबई : भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दलचा आशावाद आणि परकीय गुंतवणुकीचा कायम राहिलेला ओघ आदींमुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराने सलग तिसऱ्या आठवड्यात वाढ नोंदवली. सेन्सेक्स २५९ अंकांनी वाढून ८०,५०१ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १२ अंकांच्या किरकोळ वाढीसह २४,३४६ वर स्थिरावला.
आजच्या सत्राच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी ५० ने जवळपास १ टक्के वाढ नोंदवली. त्यानंतर ही वाढ कमी झाली.
अपेक्षेपेक्षा चांगल्या तिमाहीतील कमाईच्या जोरावर सेन्सेक्सवर अदानी पोर्ट्सचा शेअर्स ४ टक्के वाढला. त्याचबरोबर बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, एसबीआय, मारुती, टाटा मोटर्स, आयटीसी, टाटा स्टील, रिलायन्स हे शेअर्स १ ते २.६ टक्क्यांपर्यंत वाढले. तर नेस्ले इंडिया, एनटीपीसी, कोटक बँक, टायटन हे शेअर्स १ ते २ टक्के घसरले.
जेएसडब्ल्यू स्टीलचा शेअर्स (JSW Steel Share Price) आज ५.५ टक्के घसरला. भूषण पॉवर अँड स्टील लिमिटेडसाठी जेएसडब्ल्यू स्टीलचा रिझोल्यूशन प्लॅन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. २०२१ मधील हा व्यवहार बेकायदेशीर ठरवला असून या कंपनीच्या लिक्विडेशनचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर जेएसडब्ल्यू स्टीलचे गडगडले.
निफ्टीवर अदानी पोर्ट्ससह इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय टॉप गेनर्स राहिले. तर जेएसडब्ल्यू स्टील, आयशर मोटर्स, बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प, एचडीएफसी लाईफमध्ये घसरण दिसून आली.
क्षेत्रीय पातळीवर मीडिया, एनर्जी, आयटी, ऑईल अँड गॅस ०.३ ते ०.७ टक्के वाढले. तर पॉवर, मेटल, टेलिकॉम, फार्मा, रियल्टी आणि कन्झ्यूमर ड्युरेबल्स ०.५ ते २ टक्के घसरले. बीसएई मिडकॅप ०.४ टक्के घसरला. तर स्मॉलकॅप निर्देशांक सपाट झाला.
अमेरिकेच्या शेअर बाजारातील तेजी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताशी लवकरच व्यापार करार करण्याचे दिलेले संकेत, परदेशी गुंतवणूकदारांचे सलग ११ व्या सत्रात खरेदीतील सातत्य आणि आयटी कंपन्यांची चौथ्या तिमाहीतील मजबूत कमाईमुळे शेअर बाजारातील तेजीला बळ मिळाले आहे.