

Stock Market Closing Updates
मुंबई : भारतीय शेअर बाजार मंगळवारी (दि.२९) सपाट पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स ७० अंकांनी वाढून ८०,२८८ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ७ अंकाच्या किरकोळ वाढीसह २४,३३५ वर स्थिरावला. आजच्या सत्रात आयटी शेअर्स वाढले. तर फार्मा आणि मेटल शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून आला.
परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरु असलेली खरेदी, कार्पोरेट कंपन्यांची मजबूत कमाई, रिलायन्स सारख्या हेवीवेट शेअर्समधील सकारात्मक वाढीच्या आधारावर भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी (दि.२९) सलग दुसऱ्या सत्रात तेजीत सुरुवात केली होती. सेन्सेक्स ८०,३९६ वर खुला झाला. त्यानंतर ८०,३०० च्या जवळ बंद झाला.
क्षेत्रीय पातळीवर कॅपिटल गुड्स, कन्झ्यूमर ड्युराबेल्स, आयटी, ऑईल अँड गॅस हे निर्देशांक ०.५ ते १ टक्के वाढले. तर मेटल, पॉवर, टेलिकॉम, फार्मा हे शेअर्स ०.५ ते १ टक्के घसरले. बीएसई मिडकॅप ०.२ टक्के वाढला. तर स्मॉलकॅप सपाट पातळीवर स्थिरावला.
सेन्सेक्सवर टेक महिंद्रा, रिलायन्स हे शेअर्स प्रत्येकी २ टक्के वाढले. त्याचसोबत Eternal, एचसीएल टेक, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले. तर सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड, कोटक बँक हे शेअर्स १ ते २ टक्के घसरले.
काश्मीर खोऱ्यातील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणाव वाढला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत तयारी करत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये ९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. यात पारस डिफेन्स, जीआरएसई या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता.
सोमवारी परदेशी गुंतवणूकदारकांनी २,४७४ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली. तर देशांतर्गंत गुंतवणूकदारांनी २,८१७ कोटींचे शेअर्स विकले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचे (FIIs) भारतीय बाजारातील खरेदीत सातत्य कायम राहिले आहे. त्यांनी सलग ९ सत्रांत देशांतर्गत शेअर बाजारात सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली आहे.