

Stock Market Closing updates
इस्रायल- इराण यांच्यातील युद्धबंदीची घोषणा आणि त्यानंतर कच्च्चा तेलाच्या दरातील घसरणीमुळे भारतीय शेअर बाजारात मंगळवारी (दि. २४) बंपर तेजी दिसून आली. आजच्या सत्रात सेन्सेक्स १,१०० अंकांनी वाढून ८३ हजार पार झाला. पण त्यानंतर युद्धबंदीच्या उल्लंघनामुळे इस्रायलने इराणवर हल्ल्याचे आदेश दिल्याच्या वृत्तानंतर सेन्सेक्स ९५० हून अधिक अंकांनी खाली आला. सेन्सेक्स १५८ अंकांच्या वाढीसह ८२,०५५ वर स्थिरावला. तर निफ्टी ५० निर्देशांक ७२ अंकांनी वाढून २५,०४४ वर बंद झाला.
बँक, फायनान्सियल, मेटल आणि कन्झ्यूमर ड्युराबेल्स शेअर्समध्ये खरेदीचा जोर अधिक राहिला. निफ्टी पीएसयू बँक सुमारे १.५ टक्के वाढला. निफ्टी मेटल १ टक्के वाढून बंद झाला. तर दुसरीकडे निफ्टी मीडिया निर्देशांक १.१ टक्के घसरला.
बीएसई सेन्सेक्सवर अदानी पोर्ट्सचा शेअर्स २.५ टक्के वाढून टॉप गेनर ठरला. त्याचसोबत टाटा स्टील, कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, टायटन, एसबीआय, एचडीएफसी बँक, एलटी हे शेअर्सही तेजीत राहिले. तर दुसरीकडे पॉवर ग्रिड, ट्रेंट, एनटीपीसी, मारुती, एचसीएल टेक, भारत इलेक्ट्रॉनिक्स हे शेअर्स ०.५ ते १.५ टक्क्यांपर्यंत घसरले.
इस्रायल- इराण यांच्यातील युद्धबंदीची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली. ट्रम्प यांच्या या भूमिकेला इस्रायलने सहमती दर्शविल्यानंतर मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमती पाच टक्क्यांहून अधिक खाली आल्या. यामुळे बाजारात सकाळच्या व्यवहारात बंपर तेजी दिसून आली. पण त्यानंतर ही तेजी कमी झाली.
आजच्या सत्रातील सुरुवातीला शेअर बाजारात जोरदार तेजी राहिली. सेन्सेक्स १,१०० अंकांनी वाढला. तर निफ्टी ५० निर्देशांक २५.३०० पार झाला. पण त्यानंतर ट्रेडर्सनी प्रॉफिट बुकिंग सुरु केल्याने तेजी कमी झाल्याचे बाजारातील विश्लेषक सांगतात.