

Stock Market Today
मोठ्या खासगी बँकांच्या तिमाहीतील दमदार कमाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी (दि. २२ जुलै) हिरव्या रंगात सुरुवात केली. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex today) १५० हून अधिक अंकांनी वाढून ८२,३५० वर पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक २७ अंकांच्या किरकोळ वाढीसह २५,१०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे.
सेन्सेक्सवर फूड डिलिव्हरी क्षेत्रातील दिग्गज कंपनी झोमॅटोची मूळ कंपनी इटरनलचा शेअर्स (Eternal Share Price Zomato) सुरुवातीला तब्बल १५ टक्के वाढून ३११ रुपयांवर गेला. या शेअर्सचा हा सर्वकालीन उच्चांक आहे. त्यानंतर हा शेअर्स १० टक्के वाढीसह २९९ रुपयांवर व्यवहार करत आहे. जून २०२५ तिमाहीत या कंपनीने महसूल आणि नफ्यात मोठी वाढ नोंदवली आहे. या पार्श्वभूमीवर इटरनल शेअर्सने रॉकेट भरारी घेतली आहे.
त्याचबरोबर टायटन, ट्रेंट, भारत इलेक्ट्रॉनिक्स, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक हे शेअर्सही तेजीत खुले झाले आहेत. तर दुसरीकडे बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स, सन फार्मा, एम अँड एम, अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस हे शेअर्स घसरले आहेत.
दरम्यान, रियल्टी आणि फार्मा शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग दिसून आले आहे. दोन्हीही निर्देशांक प्रत्येकी १ टक्के घसरले आहेत. एफएमसीजी शेअर्समध्येही दबाव राहिला आहे. दुसरीकडे, डिफेन्स आणि कॅपिटल गुड्स शेअर्समध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला आहे.
भारतीय शेअर बाजारासाठी चांगले संकेत आहेत. आशियाई बाजारातही मजबूती दिसून आली आहे. अमेरिकेतील शेअर बाजारात काल संमिश्र वातावरण राहिले.