

* गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये अनुक्रमे एकूण 181.45 अंक व 742.74 अंकांची घसरण होऊन दोन्ही निर्देशांक 24968.4 अंक आणि 81757.73 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 0.72 टक्के तर सेन्सेक्समध्ये 0.9 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढ होणार्या समभागांमध्ये हिरोमोटोकॉर्प (4.2 टक्के), महिंद्रा अँड महिंद्रा (3.9 टक्के), बजाज ऑटो (3.5 टक्के), विप्रो (3.4 टक्के), नेस्ले इंडिया (2.9 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला. याचप्रमाणे सर्वाधिक घट होणार्या समभागांमध्ये अॅक्सिस बँक (-6.4 टक्के), एचसीएल टेक (-5.5 टक्के), कोटक महिंद्रा बँक (-3.6 टक्के), भारत इलेक्ट्रॉनिक्स(-3.6 टक्के), श्रीराम फायनान्स (-3.4 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला. या सप्ताहात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील कंपन्यांचे निकाल येणे सुरू झाले. त्यामध्ये प्रामुख्याने खासगी बँकिंग क्षेत्रातील अॅक्सिस बँकेसारख्या बलाढ्य खासगी बँकेने निराशाजनक कामगिरी केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. यामुळे बँकिंग निर्देशांक शुक्रवारी सुमारे 1.33 टक्के खाली आला. यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भांडवल बाजारात विक्रीचा सपाटा लावल्याने दोन्ही निर्देशांक खाली आले.
* देशातील सर्वात मोठा उद्योग समूह ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चा चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीचा नफा मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 76.5 टक्के वधारून 30,783 कोटी झाला. कंपनीचा महसूल 2.36 लाख कोटींवरून 5.3 टक्क्यांनी वधारून 2.73 लाख कोटींवर पोहोचला. ऑपरेटिंग नफा 36 टक्के वधारून 58,024 कोटी झाला. रिलायन्स जिओ या रिलायन्स उद्योग समूहाच्या आणखी एका महत्त्वाच्या कंपनीचा एकत्रित नफा 5698 कोटींवरून सुमारे 25 टक्के वाढून 7,110 कोटी झाला. जिओने पहिल्या तिमाहीत नवे 99 लाख ग्राहक जोडले असून, एकूण ग्राहक संख्या आता 49.8 कोटींवर पोहोचली आहे. याप्रमाणे ब्रॉडबँड प्रकारातील ग्राहक संख्येनेदेखील 2 कोटींचा टप्पा गाठला. याच समूहाची आणखी एक कंपनी रिलायन्स रिटेलचा पहिल्या तिमाहीतील निव्वळ नफा मागील तिमाहीत असणार्या 3,545 कोटींच्या तुलनेत 3,271 कोटींवर खाली आला.
* अदानी उद्योग समूह ‘एडब्ल्यूएल अॅग्री’ या व्यवसायातील भागीदारीमधून पूर्णपणे बाहेर पडणार. विल्मर इंटरनॅशनल ही सिंगापूरस्थित कंपनी आणि अदानी उद्योग समूह यांची 1999 पासून या कंपनीत प्रत्येकी 44 टक्के भागीदारी होती. परंतु, अदानी समूहाने आता पायाभूत सुविधा उभारणी व उर्जा निर्मिती क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले असून, इतर क्षेत्रातील व्यवसायातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. याच धोरणांतर्गत अदानी आता ‘एडब्लूएल अॅग्री’ कंपनीतून बाहेर पडणार. 10874 कोटींना हिस्सा विक्री होणार असून, विल्मरचा या कंपनीतील हिस्सा 64 टक्क्यापर्यंत वाढणार.
* देशातील महत्त्वाची खासगी क्षेत्रातील बँक ‘अॅक्सिस बँक’चा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या तुलनेत 3.8 टक्के घटून 6,035 कोटींवरून 5,806 कोटी झाला. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 13,448 कोटींवरून 0.8 टक्के वधारून 13,560 कोटी झाले. बँकेचे एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) 16,211 कोटींवरून 9.6 टक्के वाढून 17,765 कोटी झाले. याचप्रमाणे निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 3,553 कोटींवरून 42.6 टक्के वाढून 5,066 कोटी झाले. एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण टक्क्यांमध्ये सांगायचे झाल्यास 1.57 टक्के तर निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 0.45 टक्के झाले. अनुत्पादित कर्जासाठी कराव्या लागणार्या तरतुदींचे प्रमाण तब्बल 90 टक्के वाढून 3,948 कोटी झाले.
* बाजारनियामक ‘सेबी’कडून ‘म्युच्युअल फंड’ क्षेत्रातील नियम अधिक कडक करण्यासाठी हालचाली. एकाच पोर्टफोलिओमध्ये थोडेफार फेरफार करून वेगवेगळ्या नावांनी बाजारात योजना आणल्या जातात. तसेच एखाद्या योजनेसाठी पैसे गोळा करून प्रत्यक्षात वेगळ्याच उद्देशाने पैसे गुंतवले जातात. त्यामुळे विविध योजनांचे वर्गीकरण अधिक स्पष्ट करून समाज योजनांची नक्कल (कॉपी) टाळणे या उद्देशाने सेबी हे पाऊल उचलत आहे. 8 ऑगस्टपर्यंत यासंबंधी हरकती व सूचना मागवल्या आहेत.
* युरोपियन संघाचे रशियावर नवे निर्बंध. या निर्बंधाची झळ रोझनेफ्ट या रशियन कंपनीची भागीदारी असलेल्या गुजरात येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पाला बसली. या रशियन कंपनीची नायरा एनर्जी या नावाने भागीदारी असून, या कंपनीत रोझनेफ्ट कंपनीचा 49.13 टक्के हिस्सा आहे. या कंपनीतून उत्पादित पेट्रोल आणि डिझेल युरोपात आणण्यास युरोपने एकतर्फी बंदी घातली. भारताने या घटनेचा निषेध नोंदवला असून, भारताने कोणाकडून कच्चे खनिज तेल खरेदी करायचे याचे स्वातंत्र्य भारताला असल्याचा पुनरुच्चार केला. रशियाच्या खनिज तेलाच्या आधारभूत किमतीमध्ये युरोपने 60 डॉलर प्रतिबॅरल ऐवजी 50 डॉलर प्रतिबॅरलची कपात केल्याने भारताला आणखी स्वस्तात खनिज तेल मिळणार आहे. विविध निर्बंधाद्वारे रशियाला अडचणीत आणण्याचे युरोपचे धोरण आहे. परंत, चीन आणि भारतासारखे मोठे खरेदीदार रशियाकडे असल्याने रशियाला नमवणे युरोपला कठीण जात आहे. त्यामुळे भारतावरदेखील अप्रत्यक्षरीत्या दबाव आणण्याचे पश्चिमी राष्टांचा प्रयत्न आहे. परंतु, भारताला स्वस्त दरात रशियाकडून खनिज तेल मिळत असल्यास आपल्या नागरिकांचे स्वहित जपण्याचा पूर्ण अधिकार असून, रशियाकडून तेल खरेदी करत राहण्याची भारताची भूमिका आहे.
* प्रवासी बॅगा निर्मिती भारतातील सर्वात मोठी कंपनी ‘व्हीआयपी इंडस्ट्रीज’चे चेअरमन दिलीप पिरामल कंपनीतील 32 टक्के हिस्सा विकणार. एकूण 1,763 कोटींचा हिस्सा खासगी इक्विटीफर्म ‘मल्टीपल्स’ आणि अन्य गुंतवणूकदारांना विकली जाणार. 53 वर्षांपासून पिरामल या कंपनीची धुरा वाहत असून, पुढील पिढीला या व्यवसायात रस नसल्याने हिस्सा विक्रीचा निर्णय घेत असल्याचे पिरामल यांचे प्रतिपादन.
* स्वीडनची इलेक्ट्रोलक्स कंपनीची भारतातील नाममुद्रा ‘केल्व्हिनेटर’ रिलायन्स रिटेलने खरेदी केली. 180 दशलक्ष स्वीडिश क्रोनर म्हणजे 160 कोटी रुपयांना या कंपनीची खरेदी करण्यात आली. या नाममुद्रेअंतर्गत फ्रीज, एसी, वॉशिंग मशिन, एअरकूलर यांची निर्मिती केली जाते. ग्राहकोपयोगी वस्तूंची भारतीय बाजारपेठ 2027 साली जगातील 4 थ्या क्रमांकाची बाजारपेठ असेल. 2025 साली टीव्ही, फ्रीज, एसी, वॉशिंग मशिन यासारख्या वस्तूंची भारतीय बाजारपेठ सुमारे 1.17 लाख कोटींची आहे. 2029 पर्यंत ही बाजारपेठ दुप्पट होऊन 3 लाख कोटींवर जाण्याचा विश्लेषकांचा अंदाज आहे.
* जून महिन्यात भारतातील किरकोळ महागाईदर मागील 6 वर्षांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच 2.1 टक्क्यांपर्यंत खाली आला. याच महिन्यात घाऊक महागाईदर (डब्ल्यूपीआय) -0.13 टक्क्यांपर्यंत खाली गेला. महागाईदर आटोक्यात आल्याने ऑगस्टमध्ये पाव टक्का व्याजदर कपातीची अपेक्षा अर्थ विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या सरलेल्या जून महिन्यात किरकोळ धान्य महागाईदर (फूड रिटेल इन्फ्लेशन) मागील 76 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच -1.06 टक्क्यांवर खाली आला.
* कर्नाटकमध्ये 13 हजार किरकोळ व पदपथावर व्यवसाय करणार्या व्यापार्यांना जीएसटी नोटीस जारी. ‘यूपीआय’मार्फत होणारे व्यवहार तपासल्यावर 40 लाखांपेक्षा अधिकचा व्यवसाय असण्याची शक्यता असणार्या व्यावसायिकांना जीएसटी क्रमांक नोंदणी करण्याचे आदेश. याविरुद्ध कर्नाटकमधील व्यापार्यांनी आता ग्राहकांकडे रोखीने पैसे अदा करण्याचा आग्रह धरला आहे. राज्याकडून यास नोटीस धाडण्यात आल्याचे समजते. सध्या तरी केंद्राच्या जीएसटी विभागाकडून यासंदर्भात नोटीस दिल्या गेल्या नाहीत.
* 11 जुलै रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 3.06 अब्ज डॉलर्स घटून 696.67 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.