

Stock Market Closing Updates
भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात बुधवारी (दि.७) चढ-उतार दिसून आला. आज बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली होती. त्यानंतर त्याने जोरदार रिकव्हरी केली आणि तो हिरव्या रंगात बंद झाला. सेन्सेक्स १०५ अंकांनी वाढून ८०,७४६ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ३४ अंकांच्या किरकोळ वाढीसह २४,४१४ वर स्थिरावला.
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत (Operation Sindoor) भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानंतर सुरुवातीच्या व्यवहारात थोडीशी घसरण दिसून आली. पण नंतर बाजार सावरला. आजच्या सत्रात बाजाराने खालच्या स्तरावरून रिकव्हरी केली.
बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही जोरदार तेजी राहिली. बीएसई मिडकॅप १.३ टक्के तर स्मॉलकॅप १.१ टक्के वाढून बंद झाला. निफ्टी ऑटो निर्देशांक १.७ टक्के वाढला. रियल्टी आणि मेटल शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. एफएमसीजी, फार्मा शेअर्समध्ये दबाव राहिला.
सेन्सेक्सवर टाटा मोटर्सचा शेअर्स ५ टक्के वाढून टॉप गेनर ठरला. त्याचबरोबर बजाज फायनान्स, Eternal, एम अँड एम, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, टायटन, पॉवर ग्रिड, कोटक बँक हे शेअर्स १ ते २ टक्के वाढले. तर दुसरीकडे एशियन पेंट्सचा शेअर्स ३.५ टक्के घसरले. सन फार्मा, आयटीसी, एचसीएल टेक, रिलायन्स हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले.
'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर आज संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स फोकसमध्ये राहिले. सध्याच्या भू-राजकीय तणावामुळे संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सवर काही प्रमाणात दबाव दिसून आला. निफ्टी इंडिया डिफेन्स निर्देशांक १ टक्के घसरला. सुरुवातीला संरक्षण कंपन्यांच्या काही शेअर्समध्ये तेजी दिसून आली होती.
दरम्यान, पेटीएमचा शेअर्स (PayTM Share Price) आज ७ टक्के वाढून ८७३ रुपयांवर पोहोचला.