

Ratan Tata Property News: रतन टाटा यांचा सेशेल्समधील आलिशान बीचफ्रंट विला आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. माहे बेटाच्या शांत, नयनरम्य समुद्रकिनाऱ्यावर असलेली ही प्रॉपर्टी, स्थानिक कायद्यानुसार परदेशी नागरिकांना खरेदी करता येत नाही. मात्र, रतन टाटा यांना या नियमातून सुट देण्यात आली होती.
विला खरेदीसाठी आता एअरसेलचे संस्थापक सी. शिवशंकरन पुढाकार घेत असल्याची माहिती ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या अहवालात देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, अनेक वर्षांपूर्वी हीच मालमत्ता रतन टाटा यांना खरेदी करण्यात मदत करणारे व्यक्ती म्हणजे शिवशंकरनच होते. शिवशंकरन सेशेल्सचे नागरिक असल्याने त्यांना प्रॉपर्टी खरेदी करता येणार आहे.
तज्ज्ञांनी केलेल्या मूल्यमापनानुसार या विलााची किंमत केवळ ₹85 लाख इतकी आहे. मात्र शिवशंकरन ही प्रॉपर्टी सुमारे 6.2 मिलियन डॉलर (₹55 कोटी) देऊन खरेदी करण्यास तयार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
याबाबत विचारले असता शिवशंकरन यांनी सांगितले, “मला माहीत नाही तुम्ही कोणत्या गोष्टीबद्दल बोलत आहात,” असे म्हणत प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. यावरून चर्चा सुरू असली, तरी व्यवहार अंतिम टप्प्यात असल्याचे निश्चित नाही.
या विक्रीतून मिळणारी संपूर्ण रक्कम रतन टाटा एंडॉवमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडॉवमेंट ट्रस्टकडे जाणार आहे. रतन टाटा यांनी त्यांच्या सेशेल्स प्रॉपर्टीचे हक्क RNT Associates या सिंगापूरस्थित गुंतवणूक संस्थेकडे वळवले होते. ही संस्था भारतातील अनेक स्टार्टअप्सला निधी देते.
सी. शिवशंकरन आणि रतन टाटा यांचे नाते अत्यंत जवळचे मानले जाते. शिवशंकरन यांच्या मते, ते सलग सात वर्षे दररोज सकाळी 7.15 वाजता मुंबईतील टाटांच्या अपार्टमेंटमध्ये भेटत असत. रोज 45 मिनिटांची चर्चा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाली होती. ते सांगतात, कधीकधी रतन टाटा मीटिंगमध्येच ट्रेडमिलवर वर्कआउट करत असत.
त्यांनी एक प्रसंग सांगितला, सिंगापूर ते सेशेल्स उड्डाणादरम्यान विमानाचे इंजिन निकामी झाले. प्रवाशांना दुर्घटनेची शक्यता सांगितली गेली. शिवशंकरन एवढे घाबरले की त्यांनी मुलाला आपला Gmail पासवर्डही पाठवला. मात्र रतन टाटा अत्यंत शांत राहून म्हणाले,
“पायलटला त्यांचे काम करू द्या.”