

personal loan
नवी दिल्ली : सण-उत्सवाच्या काळात किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेकजण नवीन खरेदी करण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेत असतात. काहीजण तर देश-विदेशात फिरायला जाण्यासाठी बजेट कमी पडते म्हणून वैयक्तिक कर्ज घेतात. वैद्यकीय कारण किंवा मुलांचे शिक्षण यांसारख्या अत्यावश्यक गरजांसाठी कर्ज घेणे ठीक असले तरी, केवळ हौस म्हणून किंवा चैनीच्या वस्तूंसाठी वैयक्तिक कर्ज घेणे हे तुमच्या आर्थिक भविष्यासाठी धोकादायक ठरू शकते.
अनावश्यक खर्चासाठी वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांनी खालील ५ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे.
अवाढव्य व्याजदर
वैयक्तिक कर्जावरील व्याजदर हे इतर कर्जांपेक्षा खूप जास्त असतात. अनेक बँका यासाठी १५% ते २४% पर्यंत व्याज आकारतात. याचा स्पष्ट अर्थ असा की, तुम्ही घेतलेल्या मूळ रकमेपेक्षा २५% पर्यंत अधिक रक्कम तुम्हाला व्याजापोटी भरावी लागू शकते. यामुळे तुमची हौस खूप महागडी ठरू शकते.
नोकरीची असुरक्षितता
जर तुमची नोकरी पक्की नसेल किंवा तात्पुरत्या स्वरूपाची असेल, तर पर्सनल लोन घेणे टाळा. नोकरी मध्येच गमावल्यास कर्जाचा ईएमआय थकण्याची भीती असते. यामुळे बँक दंड आकारतेच, शिवाय तुमचा क्रेडिट स्कोअर मोठ्या प्रमाणात खराब होतो, ज्याचा भविष्यात मोठे कर्ज घेताना नकारात्मक परिणाम होतो.
कर्जाचे वाढते प्रमाण
जर तुमच्यावर आधीपासूनच अनेक कर्जे असतील आणि तुमचे 'कर्ज-ते-उत्पन्न' प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक असेल, तर नवीन कर्ज घेण्याने तुमचा आर्थिक ताण प्रचंड वाढेल. हे प्रमाण वाढल्यास तुमची आर्थिक परिस्थिती बिघडू शकते.
हौस-मौज महाग पडेल
लग्नासाठी मोठा खर्च, महागडे गॅझेट्स किंवा परदेश प्रवास यांसारख्या अनावश्यक वस्तूंसाठी घेतलेले कर्ज ही वस्तू तुम्हाला अक्षरशः दुप्पट किमतीत पडते. क्षणिक आनंदासाठी घेतलेले कर्ज दीर्घकाळ आर्थिक ओझे निर्माण करते.
धोकादायक गुंतवणुकीसाठी कर्जाचा वापर
स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड किंवा क्रिप्टोकरन्सीसारख्या जोखमीच्या गुंतवणुकीसाठी कधीही कर्ज घेऊ नका. उधार घेतलेल्या पैशाने गुंतवणूक करणे अत्यंत धोकादायक आहे. जर बाजारात नुकसान झाले, तर तुमचे कर्ज आणि गुंतवणुकीचे नुकसान असे दुहेरी संकट तुमच्यावर कोसळू शकते.
कर्ज कधी घ्यावे?
तुमच्या गरजा तातडीच्या असतील तेव्हा कर्ज घेणे योग्य आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला वैद्यकीय आणीबाणीसाठी त्वरित पैशांची आवश्यकता असेल, तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवायचा असेल किंवा घराच्या दुरुस्तीची तातडीने गरज असेल, तर कर्ज घेणे शहाणपणाचे ठरू शकते. या परिस्थितीत, तुमच्या गरजा तातडीच्या असतात आणि तुमच्याकडे वेळ कमी असतो.