RBI च्या तिजोरीत एक लाख किलो सोन्याची भर

RBI च्या तिजोरीत एक लाख किलो सोन्याची भर
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- विदेशातील तिजोरीत ठेवलेले सोने भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) भारतात पुन्हा आणणार आहे. ब्रिटनमधून येत्या काही महिन्यांत १०० टन (१ लाख किलो) सोने आरबीआयच्या तिजोरीत जमा होणार आहे. मुंबई आणि नागपूर येथे सोने ठेवले जाणार आहे. सरकारला दोन आठवड्यांपुर्वी घसघशीत लाभांश दिल्यानंतर आरबीआयने विदेशातील आपला सोनेसाठा पुन्हा आणत आपली आर्थिक ताकद जैसे थे ठेवली असल्याचे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

आरबीआयने गेल्या काही वर्षांपासून सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर केली आहे. त्यातील बराचसा भाग विदेशातील सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेक देशांकडून विदेशांतील तिजोरीत सोने ठेवले जाते. आता आरबीआय मुंबई आणि नागपुरातील सुरक्षित ठिकाणी सोने ठेवणार आहे. बँक ऑफ इंग्लंड सोने सुरक्षित ठेवण्यासाठी जगप्रसिद्ध आहे. भारतातील सोने स्वातंत्र्यपूर्व काळापासून लंडनमध्ये ठेवले जात आहे.

त्यानंतरची मोठी सोने वाहतूक आता

  • विदेशी गंगाजळी आटल्याने भारताला १९९१ साली सुवर्णसाठा तारण ठेवावा लागला होता.
  • त्या वेळी भारत सरकारवर खूप टीका झाली होती.
  • त्यानंतर भारताने उदारीकरण स्वीकारत जगासाठी आपली दारे खुली केली.
  • पुढे आर्थिक उदारीकरणास चालना मिळाली.
  • त्यानंतरचे सर्वांत मोठे सोने वाहतूक आत्ता होत आहे.
  • या वेळी विदेशात साठवलेले सोने आरबीआयच्या तिजोरीत जमा होणार आहे.

आरबीआयने खरेदी केलेल्या सोन्यापैकी निम्म्याहून अधिक साठा विदेशातील बँकांमध्ये सुरक्षित आहे. प्रत्यक्ष आरबीआयच्या तिजोरीत असलेल्या साठ्यापैकी २५ टक्के सोने (१०० टन) भारतात आणले जात आहे. अत्यंत मौल्यवान असलेला हा धातू सुरक्षितपणे देशात आणण्याचे आव्हान बँक ऑफ इंग्लंड आणि भारतावर आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी सुरू आहे. विशेष विमानाने सोने भारतात आणले जाईल. त्यावर आयात शुल्कावर सरकारने सूट दिली असली, तरी त्यावर एकात्मिक वस्तू आणि सेवाकर (आयजीएसटी) भरावा लागेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आयएमएफकडून २०० टन खरेदी

भारताला १९९१ साली सोने तारण ठेवावे लागले होते. त्यानंतर भारताची आर्थिक स्थिती सुधारली. साधारण १५ वर्षांपूर्वी आरबीआयने आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून (आयएमएफ) २०० टन सोने खरेदी केले होते. त्यानंतरही आरबीआय वेळोवेळी सोने खरेदी करीत सुवर्णसाठ्यात वाढ केली आहे.

आरबीआयकडे ८२२.१ टन सोने

आरबीआयकडे ८२२.१ टन सोने आहे. त्यातील ४१३.८ टन सोने विदेशातील सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. मार्चअखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षात आरबीआयने २७.५ टन सोन्याची खरेदी केली आहे.

हेही वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news