

bcci selectors to remove rohit sharma from test captaincy
मुंबई : आयपीएल 2025च्या समाप्तीनंतर भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडचा दौरा करायचा आहे. दोन्ही संघांची पाच कसोटी सामन्यांची मालिका 20 जूनपासून सुरू होणार आहे. दरम्यान एका मीडिया रिपोर्टमध्ये असे समोर आले आहे की, रोहित शर्माकडून लवकरच कसोटी संघाचे कर्णधारपद काढून घेतले जाईल. त्याच्या जागी संघाला नवा कर्णधार मिळू शकतो. बीसीसीआय हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआय निवडकर्त्यांनी रोहित शर्माला कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, रोहित इंग्लंड दौऱ्यावर सलामीवीर म्हणून मैदानात उतरणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रोहितला कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय त्याच्या वाढत्या वयामुळे किंवा कोणत्याही बदलामुळे घेण्यात आला नसल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या अलीकडील फॉर्मच्या आधारे हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. सध्या तरी 38 वर्षीय रोहितच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाला कोणताही धोका नसल्याचे समजते आहे.