

New Labour Code India 2026: भारतामध्ये 1 एप्रिल 2026 पासून कामगारांसाठी नवे श्रम कायदे लागू होणार आहेत. भारत सरकारने तयार केलेल्या या नव्या लेबर कोडमुळे कर्मचार्यांचे कामाचे तास, ओव्हरटाईम, वेतन आणि सामाजिक सुरक्षा यामध्ये मोठे बदल होणार आहेत. या निर्णयाचा थेट परिणाम देशातील कोट्यवधी कर्मचारी आणि उद्योग क्षेत्रावर होणार आहे.
नवीन प्रणाली अंतर्गत चार प्रमुख कोड लागू करण्यात आले आहेत —
वेतन संहिता (Wage Code)
सामाजिक सुरक्षा संहिता (Social Security Code)
औद्योगिक संबंध संहिता (Industrial Relations Code)
व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यस्थिती संहिता (OSH Code)
या चार कोडमुळे आधीचे 44 वेगवेगळे कामगार कायदे एकत्र करून सोपे आणि पारदर्शक कायदे तयार करण्यात आले आहेत.
नव्या नियमांनुसार कामाचे तास बदलले नाहीत. दिवसाला 8 तास आणि आठवड्याला 48 तास काम करावे लागणार आहे. मात्र, काम करण्याच्या पद्धतीत लवचिकता वाढवण्यात आली आहे. कंपन्या आता फ्लेक्सिबल वर्किंग मॉडेल वापरू शकतात. त्यामुळे काही दिवस जास्त काम करून इतर दिवशी सुट्टी घेण्याची संधीही मिळू शकते.
नव्या कोडमध्ये ओव्हरटाईमची व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यात आली आहे. अतिरिक्त कामासाठी योग्य मोबदला मिळणे अनिवार्य असणार आहे. आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे नियम असणार आहेत. यामुळे कर्मचारी आणि कंपनी दोघांनाही फायदा होईल, असा सरकारचा दावा आहे.
नव्या लेबर कोडचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सामाजिक सुरक्षा कव्हरेज वाढणार आहे. 100 कोटी कामगारांना लाभ देण्याचे लक्ष्य आहे. गिग वर्कर्स, फ्रीलान्सर्स आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांचा यात समावेश करण्यात आला आहे. यामुळे पहिल्यांदाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या लोकांनाही सरकारी संरक्षण मिळणार आहे.
नव्या नियमांनुसार महिलांना अधिक संधी देण्यात आल्या आहेत. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी (सुरक्षेसह) आणि समान कामासाठी समान वेतन द्यावे लागणार आहे. यामुळे महिलांच्या रोजगाराच्या संधी वाढण्याची अपेक्षा आहे. 40 वर्षांवरील कर्मचाऱ्यांना मोफत वार्षिक आरोग्य तपासणी आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेवर अधिक भर दिला जाणार आहे. हे नियम कामगारांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले जात आहे.
नवीन लेबर कोड हे भारतातील कामगार व्यवस्थेतील मोठे परिवर्तन मानले जात आहे.
हे नियम कर्मचारी आणि कंपन्यांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या बदलांचा परिणाम कसा होईल, हे पुढील काही महिन्यांत स्पष्ट होईल.