

N Chandrasekaran Salary & Net Worth: एन. चंद्रशेखरन यांनी टाटा सन्सच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या मानधनाची आणि संपत्तीचीही चर्चा सुरू झाली आहे. चंद्रशेखरन यांचा सध्याचा कार्यकाळ फेब्रुवारी 2027 मध्ये संपणार असून त्यानंतर ते पुन्हा या पदावर काम करणार नाहीत.
चंद्रशेखरन हे भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कॉर्पोरेट बॉसपैकी एक आहेत. टाटा सन्सच्या उपलब्ध वार्षिक अहवालातील आकडेवारीनुसार, 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात त्यांना एकूण ₹158.66 कोटी मानधन मिळाले. हे मानधन मागील आर्थिक वर्षातील ₹155.81 कोटींपेक्षा अधिक आहे.
चंद्रशेखरन यांच्या ₹158.66 कोटींच्या पॅकेजमध्ये संपूर्ण रक्कम नियमित पगाराची नाही. त्यातील मोठा हिस्सा टाटा सन्सच्या नफ्याशी संबंधित कमिशनचा आहे.
आर्थिक वर्ष 2026 मध्ये त्यांना ₹17.97 कोटी पगार आणि इतर लाभ मिळाले. तर तब्बल ₹140.69 कोटी कमिशनच्या स्वरूपात मिळाले. त्यामुळे त्यांच्या एकूण मानधनात कमिशनचा वाटा मोठा आहे.
याचा अर्थ चंद्रशेखरन यांना वर्षाला ₹158 कोटींचा फक्त पगार मिळतो, असं म्हणणं योग्य ठरणार नाही. त्यांच्या पॅकेजचा मोठा भाग कंपनीच्या कामगिरीशी जोडलेला आहे.
टाटा सन्सने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानधनाची माहिती जाहीर करण्यास सुरुवात केल्यानंतर चंद्रशेखरन यांच्या कमाईत मोठी वाढ झाल्याचं दिसतं. उपलब्ध आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2022 ते आर्थिक वर्ष 2026 या पाच वर्षांच्या काळात त्यांना मिळून सुमारे 685 कोटी मानधन मिळालं आहे. त्यामुळे भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कॉर्पोरेट प्रमुखांच्या यादीत त्यांचं नाव कायम चर्चेत राहिलं आहे.
चंद्रशेखरन यांच्या एकूण संपत्तीची अधिकृत माहिती सार्वजनिकपणे उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांची नेटवर्थ किती आहे, याबाबत वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळे अंदाज दिले जातात.
काही अहवालांमध्ये त्यांची संपत्ती 100 ते 150 दशलक्ष डॉलर, म्हणजे भारतीय रुपयांत अंदाजे ₹950 कोटी ते ₹1,400 कोटी असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. मात्र ही अधिकृत आकडेवारी नसल्याने हा अंदाज म्हणूनच पाहणे योग्य ठरेल.
चंद्रशेखरन आणि त्यांच्या कुटुंबाने मुंबईतील पॉश पेडर रोड परिसरात सुमारे ₹98 कोटींचं डुप्लेक्स घर खरेदी केलं आहे. या घराचं क्षेत्रफळ सुमारे 6,000 चौरस फूट असल्याची माहिती 2022 मधील वृत्तांत देण्यात आली होती. हे घर यापूर्वी चंद्रशेखरन कुटुंब भाड्याने वापरत होतं. 2022 मध्ये त्यांनी ते खरेदी केल्याचं वृत्त आलं होतं.
चंद्रशेखरन यांचा टाटा समूहाशी जवळचा संबंध अनेक दशकांचा आहे. ते 1987 मध्ये टाटा समूहात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी TCSमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम करत 2009 मध्ये कंपनीचे CEO आणि Managing Director म्हणून जबाबदारी स्वीकारली. यानंतर 2016 मध्ये ते टाटा सन्सच्या बोर्डावर आले आणि जानेवारी 2017 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली.
टाटा समूहाच्या नेतृत्वात जवळपास दशकभर महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर आता त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीसोबतच त्यांना मिळालेल्या मानधनाची आणि संपत्तीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.