

Maharashtra Budget 2026 Highlights: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर करत अनेक महत्त्वाच्या योजना आणि निर्णयांची घोषणा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर फडणवीस यांनी अर्थ खात्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली असून ते दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडत आहेत. अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी पायाभूत सुविधा, शेती, ग्रामीण विकास, उद्योग गुंतवणूक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या घोषणांची माहिती दिली.
अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर रस्ते विकासाची कामे सुरू असल्याचे सांगताना फडणवीस यांनी आतापर्यंत ३० हजार किलोमीटरहून अधिक रस्त्यांचे काम पूर्ण झाल्याची माहिती दिली. पुढील टप्प्यात म्हणजेच तिसऱ्या टप्प्यात आणखी २३ हजार किलोमीटर रस्ते आणि पूल बांधण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पाणंद रस्त्यांना मान्यता देण्यात आली आहे.
शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी काही नव्या योजनांची घोषणा करण्यात आली. “मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना”, “महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान”, “मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना” आणि “मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना” अशा योजनांचा यात समावेश आहे. या योजनांमुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील उद्योजकतेला चालना मिळेल, असा सरकारचा दावा आहे.
शेतमजुर
तसेच शेतमजुरांनाही संरक्षण देण्यासाठी गोपीनाथ मुंडे अपघात योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. या योजनेत शेतमजुरांचा समावेश करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे ग्रामीण भागातील कामगारांना आर्थिक सुरक्षा मिळण्यास मदत होणार आहे.
उद्योग आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी राज्याचे नवे गुंतवणूक धोरण जाहीर करण्यात आले आहे. या धोरणाच्या माध्यमातून उद्योगांना आकर्षित करणे आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे हा उद्देश आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म आणि लघुउद्योगांसाठी स्वतंत्र केंद्र स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. यामुळे स्थानिक पातळीवर उद्योगांना चालना मिळेल आणि ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होईल.
अर्थसंकल्पीय भाषणात काही सांस्कृतिक आणि स्मारकांशी संबंधित घोषणाही करण्यात आल्या. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ “गतिमान नागरी सेवा पुरस्कार” सुरू करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. तसेच त्यांच्या नावाने भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याशिवाय देहू येथे विकास आराखडा राबविण्याची घोषणा करण्यात आली. संत तुकाराम महाराजांच्या पवित्र स्थळाच्या विकासासाठी हा आराखडा महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याची माहितीही फडणवीस यांनी सभागृहात दिली.
एकूणच या अर्थसंकल्पातून ग्रामीण विकास, शेती, उद्योग गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि सामाजिक क्षेत्रातील विविध योजनांवर सरकारचा भर दिसून आला. पुढील काळात या योजनांची अंमलबजावणी कशी होते आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला त्यातून किती गती मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.