

मुंबई: राज्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे आर्थिक आघाडीवर पुन्हा एकदा महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व केले आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संख्येत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. राज्याने चक्क गुजरातला मोठ्या फरकाने मागे टाकत २ कोटी गुंतवणूकदारांचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.
भारतीय शेअर बाजाराने २७ एप्रिल २०२६ रोजी १३ कोटी गुंतवणूकदारांचा (PAN) टप्पा ओलांडून नवा इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे, सप्टेंबर २०२५ मध्ये १२ कोटींचा टप्पा पार केल्यानंतर अवघ्या ७ महिन्यांत १ कोटी नवीन गुंतवणूकदारांची भर पडली आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारतीय गुंतवणूकदारांचा बाजारावरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे हे लक्षण आहे.
• महाराष्ट्र: २.० कोटी गुंतवणूकदार (देशात प्रथम).
• उत्तर प्रदेश: १.५ कोटी गुंतवणूकदार (दुसऱ्या स्थानी).
• गुजरात: १.१ कोटी गुंतवणूकदार (तिसऱ्या स्थानी).
अनेकांना वाटायचे की गुजरात शेअर बाजारात पुढे आहे, मात्र या आकडेवारीने महाराष्ट्राचे आर्थिक वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
भारतीय शेअर बाजार आता अधिक सर्वसमावेशक होत आहे. यामध्ये तरुणांचा वाटा लक्षणीय आहे:
• गुंतवणूकदारांचे सरासरी वय आता ३३ वर्षे झाले आहे, जे २०२१ मध्ये ३६ वर्षे होते.
• एकूण गुंतवणूकदारांपैकी ४०% पेक्षा जास्त लोक ३० वर्षांखालील आहेत.
• आता दर चार गुंतवणूकदारांपैकी एक महिला आहे.
सर्वसामान्यांमध्ये 'एसआयपी' (SIP) द्वारे गुंतवणूक करण्याची क्रेझ प्रचंड वाढली आहे. आर्थिक वर्ष २०१७ मध्ये मासिक एसआयपी गुंतवणूक ₹३,६६० कोटी होती, ती २०२६ मध्ये ₹२९,१३२ कोटींवर पोहोचली आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ७.२ कोटी नवीन एसआयपी खाती उघडली आहेत.
"१३ कोटी गुंतवणूकदारांचा टप्पा गाठणे हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठे यश आहे. भू-राजकीय अनिश्चितता असूनही सात महिन्यांत १ कोटी नवीन गुंतवणूकदार जोडले जाणे हे बाजाराचे मोठे यश आहे. मोबाइल ट्रेडिंग, सोपी केवायसी (KYC) प्रक्रिया आणि वाढत्या आर्थिक साक्षरतेमुळे ही प्रगती शक्य झाली आहे. ही वाढ केवळ शहरांपुरती मर्यादित नसून टियर २, ३ आणि ४ शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर होत आहे."
• भौगोलिक विस्तार: शेअर बाजार आता देशातील ९९.८५% पिन कोडपर्यंत पोहोचला आहे.
• ईशान्य भारताचा सहभाग: मिझोराम (८.७ पट) आणि आसाम (६.९ पट) सारख्या राज्यांनी गुंतवणुकीत मोठी वाढ दर्शवली आहे.
• डिजिटल क्रांती: रोख बाजारातील २०% पेक्षा जास्त व्यवहार आता मोबाइल ॲप्सवरून होत आहेत.
• गुंतवणूकदार सुरक्षा: NSE चा गुंतवणूकदार संरक्षण निधी (IPF) ₹२,८७१ कोटींवर पोहोचला आहे.
एकूणच, महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्याने गुंतवणुकीच्या मैदानात मारलेली ही बाजी प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद आहे.