

LPG Cylinder Price Hike: देशभरातील एलपीजी ग्राहकांना जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका बसला आहे. तेल कंपन्यांनी 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 42 रुपयांची वाढ केली आहे. मात्र, घरगुती वापराच्या 14.2 किलोच्या सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.
नवीन दरानुसार, दिल्लीमध्ये 19 किलोचा कमर्शियल सिलेंडर आता 3,113.50 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी त्याची किंमत 3,071.50 रुपये होती. मुंबईतही कमर्शियल सिलेंडरची किंमत 3,024 रुपयांवरून 3,067.50 रुपयांपर्यंत वाढली आहे. चेन्नईमध्ये हा सिलेंडर 3,283 रुपयांना मिळणार असून बेंगळुरूमध्ये त्याची किंमत 3,198 रुपये झाली आहे.
विशेष म्हणजे, अलीकडील भू-राजकीय तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीनंतर कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही काळात कमर्शियल सिलेंडर तब्बल 1,373 रुपयांनी महाग झाला आहे. यामध्ये मागील महिन्यात झालेली 993 रुपयांची विक्रमी वाढही समाविष्ट आहे. याउलट, घरगुती सिलेंडरच्या दरात या काळात फक्त 60 रुपयांची वाढ झाली आहे.
घरगुती ग्राहकांसाठी मात्र दिलासादायक बाब म्हणजे 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीमध्ये हा सिलेंडर 913 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच 5 किलोचा छोटा घरगुती सिलेंडर 339 रुपयांना मिळत आहे. 10 किलो एक्स्ट्रालाइट एलपीजी सिलेंडरची किंमत 652 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
याशिवाय औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या मोठ्या सिलेंडरच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. 47.5 किलोच्या औद्योगिक एलपीजी सिलेंडरची किंमत 105 रुपयांनी वाढून 7,779.50 रुपये झाली आहे. तर 425 किलो क्षमतेच्या मोठ्या एलपीजी सिलेंडरची किंमत आता 69,651 रुपये झाली आहे.
कमर्शियल सिलेंडरच्या वाढलेल्या दरांचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग व्यवसाय तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात खाद्यपदार्थांच्या किमतींवरही त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो. मात्र, घरगुती ग्राहकांसाठी दर स्थिर ठेवण्यात आल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.