

LPG Rules From June 1: देशात LPG आणि PNG गॅस कनेक्शनबाबत मोठे बदल होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. विशेषतः 1 जूनपासून ‘एक घर-एक कनेक्शन’ नियम कडक होऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे. यामुळे काही नागरिकांचे LPG सिलेंडरचे कनेक्शन बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारकडून PNG (पाइप नैसर्गिक वायू) वापराला प्रोत्साहन दिले जात असले, तरी अनेक घरांमध्ये PNG कनेक्शन घेतल्यानंतरही LPG सिलेंडर सुरूच ठेवण्यात आले आहेत. यामुळे गॅस पुरवठा व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येत असल्याचे सांगितले जात आहे.
नव्या नियमानुसार, ज्या घरांमध्ये आधीच PNG कनेक्शन उपलब्ध आहे, त्या कुटुंबांना LPG कनेक्शन सरेंडर करण्यास सांगितले जाऊ शकते. तेल वितरण कंपन्या (OMCs) अशा घरांची ओळख पटवत असल्याची माहिती समोर येत आहे.
घरगुती LPG सिलेंडरचा गैरवापर, साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी एकाच पत्त्यावर PNG आणि LPG दोन्ही कनेक्शन ठेवण्यावर निर्बंध आणले जाऊ शकतात, असं म्हटलं जात आहे.
रिपोर्टनुसार, PNG सुविधा उपलब्ध असलेल्या भागांमध्ये LPG सिलेंडर रिफिल किंवा बुकिंगवर मर्यादा येऊ शकतात. सिटी गॅस वितरण कंपन्या आणि तेल कंपन्यांचे डेटाबेस आता एकत्र करण्यात आले असून, दोन्ही कनेक्शन असलेल्या ग्राहकांवर लक्ष ठेवले जात आहे.
म्हणजेच, ज्या भागात PNG उपलब्ध आहे आणि तरीही LPG सुरू ठेवले आहे, अशा ग्राहकांचे सिलेंडर कनेक्शन बंद किंवा निष्क्रिय होऊ शकते, अशी चर्चा आहे.
सरकारने अशा ग्राहकांना एक पर्यायही दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने PNG घेतल्यानंतर LPG बंद केलं आणि नंतर अशा भागात स्थलांतर केलं जिथे PNG सुविधा नाही, तर LPG कनेक्शन पुन्हा सुरू करण्याची सुविधा उपलब्ध असू शकते.
पुरवठा आणि गैरवापर नियंत्रित करण्यासाठी शहरी भागात LPG रिफिल बुकिंगमधील अंतर 21 दिवसांवरून 25 दिवस केल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामीण भागात हा कालावधी 45 दिवसांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.
घरगुती ग्राहकांना दरवर्षी 12 अनुदानित सिलेंडर मिळत राहतील. त्यापेक्षा अधिक सिलेंडर घेतल्यास बाजारभावानुसार पैसे मोजावे लागतील. तसेच नवीन LPG कनेक्शनसाठी डिपॉझिट, रेग्युलेटर, पाइप आणि इंस्टॉलेशन शुल्कात बदल होण्याची शक्यता आहे.
मात्र, या नियमांबाबत अधिकृत अधिसूचना किंवा सरकारकडून स्पष्ट घोषणा होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.