

Stock Market Today: शेअर बाजाराने आज सकाळीच गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, म्हणजेच शुक्रवारी (20 मार्च), बाजाराची सुरुवात जोरदार तेजीसह झाली आणि ओपनिंग बेलपासूनच खरेदीचा जोर दिसू लागला.
सकाळी सुमारे 9.25 वाजता BSE Sensex तब्बल 800 हून अधिक अंकांनी वाढून 75,000 च्या वर ट्रेड करत होता. त्याचवेळी Nifty 50 देखील 250 पेक्षा जास्त अंकांनी वाढून 23,200 च्या वर पोहोचला. बँकिंग शेअर्समध्येही तेजी दिसली आणि Bank Nifty सुमारे 700 अंकांनी वाढून 54,000 च्या पुढे गेला.
आजच्या ट्रेडिंगमध्ये सर्व सेक्टोरल इंडेक्स हिरव्या रंगात होते, पण आयटी सेक्टरने विशेष लक्ष वेधून घेतले. Infosys, HCL Technologies आणि Tech Mahindra यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 2% पर्यंत तेजी दिसली. Tata Steel, Reliance Industries आणि State Bank of India यांसारख्या दिग्गज शेअर्समध्येही खरेदी दिसली. विशेष म्हणजे, निफ्टी 50 मधील बहुतेक सर्व शेअर्स हिरव्या रंगात होते. फक्त HDFC Bank आणि Hindalco Industries हे शेअर्स काहीसे दबावात दिसले.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही गुंतवणूकदारांचा उत्साह दिसून आला. या दोन्ही इंडेक्समध्ये 1 ते 1.7 टक्क्यांपर्यंत वाढ झाली, म्हणजेच बाजारातील तेजी ही केवळ मोठ्या शेअर्सपुरती मर्यादित नाही.
आजच्या तेजीमागे एक मोठं कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण. काल इंट्राडेमध्ये 119 डॉलरच्या वर गेलेलं क्रूड आता 105 डॉलरच्या आसपास आलं आहे. महागड्या तेलामुळे वाढणारी महागाई आणि कंपन्यांच्या मार्जिनवर येणारा दबाव कमी होण्याची शक्यता असल्यामुळे बाजाराने या घडामोडीला सकारात्मक प्रतिसाद दिला.
ग्लोबल संकेतही काही प्रमाणात सकारात्मक दिसत आहेत. GIFT निफ्टी सकाळीच 150 पेक्षा जास्त अंकांनी वाढून 23,200 च्या वर ट्रेड करत होता. डाओ फ्युचर्समध्येही थोडीशी वाढ दिसली. मात्र, अमेरिकन बाजारात काल काहीशी घसरण झाली. डाओ सुमारे 200 अंकांनी घसरला, तर नॅस्डॅकमध्येही चढ-उतारानंतर थोडी घसरण झाली.
दरम्यान, जागतिक पातळीवरील अनिश्चितता अजूनही पूर्णपणे संपलेली नाही. विशेषतः मध्यपूर्वेतील तणाव हा बाजारासाठी मोठा रिस्क फॅक्टर ठरत आहे. अमेरिका इराणवरील काही निर्बंध शिथिल करण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा आहेत, ज्यामुळे तेल पुरवठा वाढू शकतो.
हॉर्मुज सामुद्रधुनीबाबत वाढलेल्या तणावानेही चिंता वाढवली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर संभाव्य टोल आणि हल्ल्यांच्या बातम्यांमुळे जागतिक सप्लाय चेनवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जपान, फ्रान्स आणि जर्मनीसारख्या देशांनी याबाबत नाराजी व्यक्त करत तेल आणि गॅस स्थळांवरील हल्ले थांबवण्याची मागणी केली आहे.