Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ६६७ अंकांनी घसरून बंद, उडाले १.८३ लाख कोटी
पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक कमकुवत संकेत आणि लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात बुधवारी (दि.२९) घसरण झाली. सलग चौथ्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी नकारात्मक पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स ६६७ अंकांनी घसरून ७४,५०२ वर बंद झाला. तर निफ्टी १८३ अंकांच्या घसरणीसह २२,७०४ वर स्थिरावला. आजच्या ट्रेडिंग सत्रात आयटी, ऑईल आणि गॅस, रियल्टी आणि बँकिंग शेअर्सवर सर्वाधिक विक्रीचा दबाव दिसून आला.
क्षेत्रीय आघाडीवर संमिश्र कल दिसून आला. कॅपिटल गुड्स, हेल्थकेअर, मेटल, पॉवर हिरव्या रंगात बंद झाले. तर ऑटो, बँक, एफएमसीजी, आयटी, ऑईल आणि गॅस आणि रियल्टी ०.३-१ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप ०.३ टक्क्यांनी घसरला. तर स्मॉलकॅप ०.२ टक्क्यांनी वाढून बंद झाला.
बाजारातील घडामोडी
- सेन्सेक्स- निफ्टी सलग चौथ्या सत्रांत घसरणीसह बंद
- सेन्सेक्स ६६७ अंकांनी घसरून ७४,५०२ वर बंद
- निफ्टी १८३ अंकांच्या घसरणीसह २२,७०४ वर स्थिरावला
- ऑईल आणि गॅस, आयटी, रियल्टी आणि बँकिंग शेअर्सवर विक्रीचा दबाव
- बीएसई मिडकॅप ०.३ टक्क्यांनी घसरला
- स्मॉलकॅप ०.२ टक्क्यांनी वाढला
गुंतवणूकदारांना १.८३ लाख कोटींचा फटका
बाजारातील घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज २९ मे रोजी १.८३ लाख कोटींनी कमी होऊन ४१५.०९ लाख कोटींवर आले. २८ मे रोजी बाजार भांडवल ४१६.९२ लाख कोटी रुपये होते.
'हे' हेवीवेट शेअर्स घसरले
सेन्सेक्सवर आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक हे शेअर्स प्रत्येकी २ टक्क्यांनी घसरले. तसेच एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय, इन्फोसिस, विप्रो, कोटक बँक हे शेअर्स प्रत्येकी सुमारे १ टक्क्याने खाली आले. रिलायन्सचा शेअर्सही ०.९ टक्क्यांनी घसरला. तर पॉवर ग्रिड, सन फार्मा, नेस्ले इंडिया हे शेअर्स १ टक्क्याने वाढले.
निफ्टीवरील टॉप गेनर्स कोण?
निफ्टीवर एचडीएफसी लाईफ, एसबीआय लाईफ, टेक महिंद्रा, टाटा कन्झ्यूमर, बजाज फायनान्स हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले. हे शेअर्स २ ते ३ टक्क्यांनी घसरले. तर हिंदाल्को, पॉवर ग्रिड, डिव्हिज लॅब, बजाज ऑटो, सिप्ला हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस १.५ टक्क्यांनी आणि निफ्टी बँक १.२ टक्क्यांनी आणि निफ्टी आयटी १ टक्क्याने घसरला.
अदानी इफेक्ट! Paytm शेअर्सला ५ टक्क्यांचे अप्पर सर्किट
पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सच्या शेअर्सला बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात ५ टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्समधील हिस्सेदारी विकत घेणार असल्याच्या पेटीएमचे शेअर्सला वधारले. हा शेअर्स (One97 Communications Share Price) आज एनएसईवर ३५९ रुपयांवर राहिला. दरम्यान, पेटीएमने मात्र एक्सचेंजेसला सांगितले की, ही केवळ अटकळ आहे. फर्मने याबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही.
परदेशी गुंतवणूकदार
२८ मे रोजी परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय बाजारात निव्वळ खरेदीदार राहिले. त्यांनी ६५.५७ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी खरेदीवर जोर कायम ठेवला असून त्यांनी याच एका दिवसात ३,२३१.६७ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.
हे ही वाचा :