Indian Economy: डॉलर तर सोडाच, पण पाकिस्तानी चलनाच्या तुलनेतही भारतीय रुपया घसरला? गेल्या १० वर्षांचा लेखाजोखा

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि मध्य पूर्वेतील वाढता भू-राजकीय तणाव याचा थेट फटका भारतीय चलनावर बसत आहे.
Indian Economy
Indian EconomyFile Photo
Published on
Updated on

Indian Economy

मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि मध्य पूर्वेतील वाढता भू-राजकीय तणाव याचा थेट फटका भारतीय चलनावर बसत आहे. मंगळवार (दि. १९) रुपया डॉलरच्या तुलनेत ९६.४५ या नव्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला. या घसरणीमुळे बाजारातील एकूण वातावरणावरही दबाव वाढला आहे.

रुपयाची घसरण सुरूच

इराण युद्ध सुरू झाल्यापासून म्हणजेच फेब्रुवारीच्या उत्तरार्धापासून आतापर्यंत भारतीय रुपयाच्या मूल्यात ५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. तर, केवळ गेल्या एका आठवड्यात रुपया २.२ टक्क्यांनी कमकुवत झाला आहे. यापूर्वी सोमवारी रुपया ९६.१९ च्या पातळीवर उघडला होता आणि दिवसांतर्गत व्यवहारादरम्यान घसरून ९६.३९ या विक्रमी नीचांकी पातळीवर गेला होता. गेल्या आठवड्यात शुक्रवारीच भारतीय चलनाने ९६ चा टप्पा ओलांडला होता आणि तो ९५.८१ वर बंद झाला होता.

Indian Economy
Petrol Diesel Price Hike: सर्वसामान्यांना झटका: पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या, पहा तुमच्या शहरातील नवे दर!

पाकिस्तानच्या तुलनेत भारतीय रुपया घसरला आहे का?

भारतीय रुपया केवळ डॉलरच्या तुलनेतच नाही तर पाकिस्तानच्या चलनाच्या तुलनेत कमकुवत झाला आहे, असा दावा केला जात आहे. २०१६ ते २०२६ या गेल्या १० वर्षांच्या अधिकृत आकडेवारीवर नजर टाकली, तर हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं स्पष्ट होतं. मात्र, गेल्या एका वर्षातील आकडेवारी नक्कीच लक्ष वेधून घेणारी आहे, ज्यावरून हे स्पष्ट होते की गेल्या वर्षभरात पाकिस्तानी रुपयाच्या तुलनेत भारतीय रुपया काही प्रमाणात घसरला आहे.

गेल्या एका दशकात भारतीय रुपया पाकिस्तानी चलनापेक्षा कमकुवत झाला आहे हा समज चुकीचा आहे. वास्तविक पाहता, गेल्या १० वर्षांत पाकिस्तानी रुपयाच्या तुलनेत भारतीय रूपया भक्कम आहे. २०१६ मध्ये १ भारतीय रुपया जवळपास १.५६ पाकिस्तानी रुपयांच्या बरोबरीचा होता. पाकिस्तानमधील राजकीय अस्थिरता, घटणारा परकीय चलन साठा आणि नियंत्रणाबाहेर गेलेली महागाई यामुळे पाकिस्तानी रुपया सातत्याने घसरत गेला, तर दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्थेने वेगवान प्रगती केली. हा फरक इतका वाढला होता की, २०२३-२०२४ दरम्यान १ भारतीय रुपयाची किंमत ३.३६ पाकिस्तानी रुपयांवर पोहोचली होती. म्हणजेच, गेल्या १० वर्षांच्या प्रवासात भारतीय रुपयाने पाकिस्तानच्या चलनासमोर आपले मूल्य दुप्पट केले.

गेल्या १० वर्षांची आकडेवारी

खालील तक्त्यामध्ये, २०१६ पासून पाकिस्तानी रुपयाच्या तुलनेत भारतीय रुपयाचा आलेख कशा प्रकारे चढत्या क्रमाने राहिला आहे, हे स्पष्टपणे पाहू शकता:

Indian Rupee vs Pakistani Rupee
Indian Rupee vs Pakistani Rupee

...तर मग रुपया घसरल्याची चर्चा का?

दीर्घकालीन (१० वर्षे) आकडेवारीत भारतीय रुपया भक्कम स्थितीत असला, तरी गेल्या १ ते दीड वर्षाच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यास चित्र थोडे बदललेले दिसते. रुपया घसरल्याच्या चर्चांना नेमकी येथूनच हवा मिळाली आहे. २०२४ च्या मध्यावर १ भारतीय रुपयाची किंमत ३.३४ पाकिस्तानच्या रूपयाच्या आसपास होती, जी मे २०२६ मध्ये घसरून २.८९ PKR वर आली आहे. म्हणजेच गेल्या एका वर्षात (मे २०२५ ते मे २०२६) भारतीय रुपया पाकिस्तानी रुपयाच्या तुलनेत सुमारे १२ टक्क्यांनी घसरला आहे.

या बदलामागे अनेक कारणे आहेत. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळालेले बेलआउट पॅकेज आणि तिथल्या सरकारने अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी घेतलेले कडक निर्णय यामुळे पाकिस्तानी चलनात सुधारणा होत आहे. दुसरीकडे, जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे भारतीय रुपयावर दबाव वाढला आहे.

आशियातील सर्वात कमकुवत चलन?

मे २०२६ च्या ताज्या आर्थिक अहवालानुसार, आशियाई देशांच्या तुलनेत भारतीय रुपयाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. २०२५ आणि २०२६ मध्ये आतापर्यंत भारतीय रुपया आशियातील सर्वात खराब कामगिरी करणारे चलन ठरले आहे. चीन, मलेशिया आणि सिंगापूर सारख्या देशांनी आपली चलने मजबूत केली आहेत, ज्यामुळे या चलनांच्या तुलनेत भारतीय रुपया ६ टक्के ते ९ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. तर इंडोनेशियाच्या चलनाच्या तुलनेत भारतीय रुपया स्थिर आहे.

रुपया का घसरत आहे?

परकीय चलन व्यापाऱ्यांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थांसमोरील आव्हाने अधिकच तीव्र होत आहेत. तेल महाग होत असल्याने, भारताचे आयात खर्च वाढत आहे, ज्यामुळे देशाबाहेर जाणारा डॉलरचा ओघ वाढला आहे. याशिवाय, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसे काढून घेतल्यामुळे रुपयावर दबाव आहे.

जर भारतीय रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप केला आणि सोने-चांदीच्या आयातीवर काही निर्बंध लादले, तर रुपयाला खालच्या पातळ्यांवर आधार मिळू शकतो. दरम्यान, रुपया घसरला असला तरी मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली आणि सेन्सेक्स-निफ्टी ०.३ टक्क्यांच्या वाढीसह उघडले.

Indian Economy
India Russia oil trade | भारताने अमेरिकेचे निर्बंध झुगारले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news