

India’s Crude Oil Basket Explained: भारत आपल्या ऊर्जेच्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलावर अवलंबून आहे. देशाच्या एकूण गरजेपैकी तब्बल 85 टक्क्यांहून अधिक कच्चं तेल भारताला परदेशातून आयात करावं लागतं. काही वर्षांपूर्वी भारत प्रामुख्याने पश्चिम आशियातील मोजक्या देशांवर अवलंबून होता. मात्र आता भारताने आपली तेल खरेदीची रणनीती बदलली असून, जगभरातील जवळपास 40 देशांकडून कच्चं तेल आयात केलं जात आहे.
2022 पूर्वी भारत केवळ 27 देशांकडून तेल घेत होता. रशिया-युक्रेन युद्ध, पश्चिमी निर्बंध आणि एखाद्या देशावर अवलंबून राहण्याचा धोका लक्षात घेऊन भारताने पुरवठ्याचा विस्तार केला.
सध्या रशिया हा भारताचा सर्वात मोठा कच्चा तेल पुरवठादार आहे. 2025 मध्ये भारताच्या एकूण तेल आयातीपैकी सुमारे 35 ते 36 टक्के तेल रशियाकडून आले. पश्चिमी देशांच्या निर्बंधांमुळे रशियाने सवलतीच्या दरात तेल दिल्याचा भारताला मोठा फायदा झाला. मात्र वर्षाच्या अखेरीस निर्बंधांचा दबाव वाढल्याने रशियाचा वाटा थोडासा कमी झाला.
रशियानंतर इराक दुसऱ्या क्रमांकावर असून त्याचा वाटा सुमारे 20 ते 23 टक्के आहे. त्यानंतर सौदी अरेबिया (16 ते 18 टक्के) आणि संयुक्त अरब अमिरात (8 ते 10 टक्के) हे भारताचे महत्त्वाचे पुरवठादार आहेत. पश्चिम आशिया अजूनही भारतासाठी तेलाचा महत्त्वाचा स्रोत आहे.
अमेरिकेकडून भारताची कच्च्या तेलाची आयात सातत्याने वाढताना दिसते. 2025 च्या अखेरीस अमेरिकेचा वाटा 6 ते 7 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. काही वेळा तर हा वाटा 12 टक्क्यांपर्यंत गेला असल्याचंही आकडेवारीतून दिसतं.
एकेकाळी भारतासाठी महत्त्वाचा पुरवठादार असलेला व्हेनेझुएला आता तेल आयातीत जवळजवळ बाजूला पडला आहे. नोव्हेंबर 2025 पर्यंत भारताच्या एकूण तेल आयातीत व्हेनेझुएलाचा वाटा केवळ 0.3 ते 0.6 टक्के इतकाच राहिला. तुलना केली तर 2013 मध्ये हा वाटा 12.4 टक्के, 2019 मध्ये 5.9 टक्के आणि 2020 मध्ये 3.6 टक्के होता.
ही घसरण होण्यामागे अमेरिकेचे निर्बंध, पेमेंटशी संबंधित अडचणी आणि व्यापारावरील दबाव ही प्रमुख कारणं आहेत. याच कारणांमुळे मे 2025 नंतर भारतीय रिफायनऱ्यांनी व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी जवळपास थांबवली.
व्हेनेझुएलाचा वाटा कमी झाला असला तरी तो भारताच्या ऊर्जा धोरणातून पूर्णपणे बाहेर गेलेला नाही. 2024 मध्ये व्हेनेझुएला काही काळासाठी भारताचा दहावा सर्वात मोठा पुरवठादार होता. त्या काळात व्हेनेझुएलाकडून भारताला सुमारे 22 मिलियन बॅरल कच्चं तेल मिळालं होतं.
एकूणच, भारताने गेल्या काही वर्षांत कच्च्या तेलाचे आयात धोरण अधिक व्यापक आणि सुरक्षित केले असून, कोणत्याही एका देशावर किंवा प्रदेशावर अवलंबून न राहण्याचा प्रयत्न केला आहे.