

India GDP
आथिक वर्ष २०२४- २०२५ च्या अखेरच्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) भारतीय अर्थव्यवस्थेने दमदार कामगिरी केली. ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात जीडीपी वाढ ७.४ टक्के राहिली. जी गेल्या चार तिमाहीच्या तुलनेत सर्वाधिक आहे. तर संपूर्ण आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये जीडीपी ६.५ टक्के वाढ नोंदवण्यात आली. याबाबतची आकडेवारी शुक्रवारी (दि.३० मे) राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NS0) आणि सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रसिद्ध केली.
देशातील अर्थव्यवस्थेने दर तिमाहीत गती घेतली असली तरी, संपूर्ण वर्षातील ६.५ टक्के एवढी जीडीपी वाढ ही चार वर्षातील सर्वात कमी आहे. देशात २०२१-२२ मध्ये जीडीपी वाढीचा दर ९.७ टक्के होता. तर २०२२-२३ मध्ये ७.६ टक्के २०२३-२४ मध्ये ९.२ टक्के राहिला होता.
आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कृषी क्षेत्रातील वाढ ४.६ टक्के राहिली. मागील वर्षीच्या २.७ टक्क्यांच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे. या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कृषी क्षेत्रातील वाढ ५.४ टक्के एवढी राहिली. ही गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ०.९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये बांधकाम क्षेत्रातील (Construction sector) वाढ ९.४ टक्के राहण्याचा अंदाज आहे, त्यानंतर सार्वजनिक प्रशासन, संरक्षण आणि इतर सेवा क्षेत्रांची वाढ ८.९ टक्के आणि वित्तीय, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवा क्षेत्राची वाढ ७.२ टक्के राहणार असल्याचे आकडेवारीवरुन दिसून आले आहे.
चौथ्या तिमाहीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल टॅरिफ धोरण आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक व्यापारात अडथळे आले. तरीही ग्रामीण भागातील वाढलेली मागणी आणि सरकारी खर्चात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेने येणाऱ्या आव्हानांवर मात केल्याचे दिसून आले.