

IBM AI Training India: IBM कंपनीने 2030 पर्यंत 50 लाख भारतीय विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), सायबरसिक्युरिटी आणि क्वांटम कम्प्युटिंग या अत्याधुनिक क्षेत्रांत प्रशिक्षण देण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा 19 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आली.
हे प्रशिक्षण IBM SkillsBuild या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. विद्यार्थी असोत किंवा नोकरीसाठी नव्याने कौशल्य शिकू इच्छिणारे प्रौढ, सर्वांसाठी प्रगत डिजिटल कौशल्ये आणि रोजगाराच्या नव्या संधी खुल्या करणं हे IBMचं ध्येय आहे.
या योजनेअंतर्गत IBM देशभरातील शाळा, महाविद्यालये, आयटीआय, कौशल्य प्रशिक्षण संस्था आणि व्यावसायिक शिक्षण केंद्रांमध्ये AI आणि नव्या तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देणार आहे. यासाठी AICTE सारख्या शैक्षणिक संस्थांसोबत सहकार्य केलं जाणार आहे. तसेच प्राध्यापक प्रशिक्षण, प्रत्यक्ष अनुभवावर आधारित AI शिक्षण, हॅकाथॉन आणि इंटर्नशिप्स आयोजित केल्या जातील.
IBMचे चेअरमन, प्रेसिडेंट आणि सीईओ अरविंद कृष्णा यांनी सांगितलं की, “AI आणि क्वांटम कम्प्युटिंगसारख्या प्रगत तंत्रज्ञानात जागतिक नेतृत्व करण्याची क्षमता भारताकडे आहे. ही कौशल्ये वैज्ञानिक प्रगती आणि सामाजिक परिवर्तनासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. 50 लाख लोकांना प्रशिक्षण देणं ही केवळ घोषणा नाही, तर भारताच्या भविष्यातील विकासासाठी केलेली मोठी गुंतवणूक आहे.”
IBM शालेय स्तरावरही काम करत आहे. वरिष्ठ माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी खास AI अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून शिक्षकांसाठी AI Project Cookbook, Teacher Handbook आणि विविध मार्गदर्शक मॉड्यूल्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना लहान वयातच AI वापरण्याची सवय लावणं.
या संपूर्ण उपक्रमाचा केंद्रबिंदू म्हणजे IBM SkillsBuild. हे एक मोफत आणि सहज उपलब्ध असलेलं डिजिटल व्यासपीठ आहे. यात AI, सायबरसिक्युरिटी, क्वांटम, क्लाउड, डेटा, सस्टेनेबिलिटी आणि नोकरीसाठी आवश्यक सॉफ्ट स्किल्स असे 1,000 हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आजपर्यंत जगभरातील 1.6 कोटींहून अधिक लोकांनी या प्लॅटफॉर्मचा लाभ घेतला आहे.
2030 पर्यंत जगभरात 3 कोटी लोकांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचं IBMचं लक्ष्य असून, त्यात भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. या उपक्रमामुळे भारतीय तरुणांना जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनवण्यास मोठी मदत होणार आहे.