Home Loan EMI: होम लोनचा EMI भरला नाही तर किती दंड लागतो? CIBIL स्कोअरवर काय परिणाम होतो? जाणून घ्या बँकेचा नियम
Home Loan EMI Penalty: घराचं स्वप्न पूर्ण करताना बहुतांश लोक होम लोन घेतात. पण कधी कधी पगार उशिरा होणं, अचानक वाढलेला खर्च किंवा मेडिकल इमर्जन्सीमुळे एखाद्या महिन्याचा EMI वेळेवर भरता येत नाही. अशावेळी अनेकांच्या मनात प्रश्न असतो की आता किती दंड भरावा लागणार?
EMI ची ठरलेली तारीख गेली की बँकेच्या सिस्टिममध्ये तुमचं खातं “ओव्हरड्यू” म्हणून दिसू लागतं. सुरुवातीला बँक SMS किंवा ईमेलद्वारे आठवण करून देते. काही दिवसांनी पेमेंट झालं नाही, तर कलेक्शन टीमकडून फोन येऊ शकतो आणि उशिराचं कारण विचारलं जातं. हे सगळं प्राथमिक टप्प्यावरचं असतं.
याच दरम्यान बँक लेट पेमेंट चार्ज किंवा पेनल्टी व्याज आकारते. हा दंड प्रत्येक बँकेत वेगळा असतो आणि तुमच्या लोन अॅग्रीमेंटनुसार ठरतो. साधारणपणे थकीत EMI वर अतिरिक्त व्याज लावलं जातं. उशीर जितका जास्त, तितका दंडही वाढतो. त्यामुळे EMI चुकला असेल, तर शक्य तितक्या लवकर रक्कम भरून टाकणं फायद्याचं ठरतं.
बहुतेक लोकांना लगेच CIBIL स्कोअर खराब होईल की काय, याची भीती वाटते. मात्र प्रत्यक्षात एका-दोन दिवसांच्या उशिरामुळे लगेच क्रेडिट स्कोअर बिघडत नाही. साधारण 30 दिवसांपेक्षा जास्त थकबाकी राहिल्यावरच बँका ही माहिती क्रेडिट ब्युरोकडे पाठवतात. म्हणजे तुम्ही महिन्याच्या आत EMI भरला, तर मोठा परिणाम होत नाही. पण ही चूक वारंवार झाली, तर मात्र CIBIL स्कोअर झपाट्याने घसरू शकतो आणि पुढे नवीन कर्ज घेणं अवघड हो शकतं.
आणखी एक मोठी भीती म्हणजे EMI चुकला तर बँक लगेच घर जप्त करेल का? याचं उत्तर ‘नाही’ असं आहे. एक EMI मिस झाला म्हणून बँक थेट कायदेशीर कारवाई करत नाही. नियमांनुसार, सलग 90 दिवस पेमेंट न झाल्यासच लोन NPA (नॉन-परफॉर्मिंग अॅसेट) घोषित केलं जातं. त्यानंतरच नोटीस, कायदेशीर प्रक्रिया आणि पुढील कारवाई सुरू होते. म्हणजे एका महिन्यात चुक झाली म्हणून घर जाण्याचा धोका नसतो, पण सतत दुर्लक्ष केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते.
जर EMI चुकला असेल, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँकेशी संपर्क साधणं. उशिराचं कारण स्पष्ट सांगा आणि शक्य तितक्या लवकर पेनल्टीसह रक्कम भरून टाका. जर आर्थिक अडचण असेल, तर बँकेशी री-शेड्युलिंग, EMI कमी करणं किंवा काही काळासाठी मोरेटोरियमसारख्या पर्यायांवर चर्चा करता येते. अनेक वेळा मोकळेपणाने बोलल्यास बँकही सहकार्य करते.
थोडक्यात सांगायचं तर, एखादा EMI चुकला तर त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. वेळेत संवाद, लवकरात लवकर पेमेंट आणि योग्य नियोजन केलं, तर मोठा आर्थिक फटका टाळता येतो. होम लोन घेताना फक्त EMI नव्हे, तर आपत्कालीन निधीही बाजूला ठेवणं हेच शहाणपणाचं पाऊल ठरतं.

