

Gold Silver Prices Today: दिल्ली सराफा बाजारात 6 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली. सोन्याचा भाव 200 रुपयांनी घसरुन 1,49,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. दुसरीकडे, चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. चांदी 2.27 लाख रुपये प्रति किलोवर स्थिर राहिली.
तज्ज्ञांच्या मते, देशांतर्गत बाजारातील सोन्याची मागणी कमी झाल्याने सोन्याच्या दरावर दबाव आला आहे. डॉलर मजबूत झाल्याचाही परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ कमोडिटी विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, पितृपक्षामुळे बाजारात सोने, चांदी आणि दागिन्यांची खरेदी कमी झाली आहे.
पितृपक्षाच्या काळात अनेकजण सोने-चांदी, दागिने तसेच मालमत्ता खरेदी करणे टाळतात. त्यामुळे या काळात बाजारातील मागणीवर परिणाम होतो.
मनीकंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही. चांदीचा भाव 2.27 लाख रुपये प्रति किलोवर कायम आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात किंचित घसरण झाली. चांदीचा भाव 0.11 टक्क्यांनी घसरुन 60.90 डॉलर प्रति औंसवर आला.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात मात्र किंचित वाढ झाली. सोन्याचा भाव 0.38 टक्क्यांनी वाढून 4,154 डॉलर प्रति औंसवर पोहोचला. दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली. ब्रेंट क्रूडचा भाव 2 टक्क्यांहून अधिक घसरून 98.21 डॉलर प्रति बॅरलवर आला.
या वर्षाच्या सुरुवातीला सोने आणि चांदीच्या किमतींनी विक्रमी पातळी गाठली होती. त्यानंतर दोन्ही धातूंच्या दरात मोठी घसरण झाली. अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे या दबावात आणखी वाढ झाली.
मध्यपूर्वेतील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली होती. त्याचा परिणाम महागाईवर होऊ शकतो. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी जगातील प्रमुख केंद्रीय बँका व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतात.
व्याजदर वाढले की सोन्यात गुंतवणूक कमी होते. त्यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव येतो. त्याचबरोबर डॉलर मजबूत झाल्यास इतर देशांच्या चलनात सोने खरेदी करणे महाग होते. याचाही सोन्याच्या दरावर नकारात्मक परिणाम होतो.
7 ऑक्टोबर रोजी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आपले मौद्रिक धोरण जाहीर करणार आहे. त्यानंतर या महिन्याच्या अखेरीस अमेरिकेची फेडरल रिझर्व्हही व्याजदरासंदर्भात निर्णय घेणार आहे. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात बदल केला नाही, तर सोन्याच्या किमतीवरील दबाव काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.