

Gold Rate Today
सोने- चांदी दरात वाढ झाली आहे. बुधवारी (दि.३० जुलै) शुद्ध सोन्याचा दर ३९१ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ९८,६८७ रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर २९३ रुपयांची वाढून प्रति किलो १,१३,६०० रुपयांवर खुला झाला आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९८,६८७ रुपये, २२ कॅरेट ९०,३९७ रुपये, १८ कॅरेट ७४,०१५ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ५७,७३२ रुपयांवर खुला झाला आहे.
अमेरिकेच्या ट्रेजरी यिल्डमध्ये घसरण आणि डॉलरमधील कमकुवतपणा हे सोन्याच्या तेजीमागील कारणे आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरु आहे. अमेरिका- युरोपियन युनियन यांच्यातील व्यापार करारामुळे सोन्याची मागणी कमी झाली होती. आता पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील दर, आयातीवरील शुल्क आणि कर, रुपया आणि डॉलर यांच्यामधील विनिमय दर, मागणी आणि पुरवठा यावर सोन्याच्या दर निश्चित केला जातो. भारतात सोन्याची खरेदी केवळ गुंतवणुकीसाठीच नव्हे तर लग्न आणि सणासुदीच्या काळातदेखील केली जाते. जर सोन्याचा दरात बदल झाला तर त्याचा थेट परिणाम लोकांवर होतो.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्याजदर कमी करण्याचे अनेकवेळा सूचित केले आहे. दरम्यान, फेडरल रिझर्व्हकडून सप्टेंबरमध्ये संभाव्य व्याजदर कपातीच्या शक्यतेने सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. कारण कमी व्याजदराच्या शक्यतेने सोन्याच्या दरात तेजी येत असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.