Salary Hike 2025-26
चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारतातील कार्पोरेट क्षेत्रात सरासरी ६.२ ते ११.३ टक्क्यांपर्यंत पगारवाढ अपेक्षित आहे. मंगळवार (दि. २९ जुलै) जारी करण्यात आलेल्या एका अहवालातून हा अंदाज व्यक्त केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, नियोक्त्यांकडून कौशल्य प्रमाणपत्र आणि प्रोत्साहन आधारित नेतृत्वावर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. यामुळे ते त्यांच्या मनुष्यबळ धोरणांमध्ये बदल करत आहेत.
टीमलीज सर्व्हिसेस- जॉब्स अँड सॅलरीज प्रायमर २०२५-२६ च्या अहवालातील माहितीनुसार, सर्व उद्योगांमध्ये सरासरी ६.२ टक्के ते ११.३ टक्क्यांदरम्यान पगारवाढ होण्याचा अंदाज आहे. तर काही विशिष्ट पदांवरील कर्मचाऱ्यांची १३.८ टक्क्यांपर्यंत पगारवाढ होणे अपेक्षित आहे.
"६.२ टक्के ते ११.३ टक्के दरम्यानची अपेक्षित पगारवाढ ही देशातील नोकरी आणि वेतन क्षेत्रातील व्यापक अशा बदलाचे संकेत देते. नवीन युगातील उद्योग वेगाने वाढत असताना, तांत्रिक कौशल्ये आवश्यक असलेल्या भूमिकांची मागणीदेखील वेगाने वाढू लागली आहे.," असे टीमलीज सर्व्हिसेसचे सीईओ- स्टाफिंग, कार्तिक नारायण यांनी म्हटले आहे.
२३ उद्योग आणि २० शहरांमधील १,३०८ व्यवसायांतील माहितीच्या आधारावर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालात असेही नमूद केले आहे की, विशेषतः ईव्ही आणि ईव्हीशी संबंधित इन्फ्रास्ट्रक्चर (११.३ टक्के), कन्झ्यूमर ड्युरेबल्स (१०.७ टक्के), रिटेल (१०.७ टक्के) आणि एनबीएफसी (१०.४ टक्के) यासारख्या उद्योग क्षेत्रांमध्ये सर्वाधिक पगारवाढ होणे अपेक्षित आहे.
ईव्ही आणि ईव्ही इन्फ्रास्ट्रक्चरमधील इलेक्ट्रिकल डिझाइन इंजिनिअर (१२.४ टक्के), कन्झ्यूमर ड्युरेबल्स क्षेत्रातील इन-स्टोअर डेमॉन्स्ट्रेटर (१२.२ टक्के), एनबीएफसीतील रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह (११.६ टक्के) आणि रिटेलमधील फॅशन असिस्टंट (११.२ टक्के) या पदांवर सर्वाधिक पगारवाढ मिळणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.
पायाभूत सुविधांमध्ये वाढती गुंतवणूक, विस्तारत असलेला ईव्ही इकोसिस्टम आणि रिअल इस्टेट आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुरु असलेल्या तेजीमुळे या क्षेत्रात भरघोस पगारवाढ होत असल्याचे आढळून आले आहे. मेकॅनिक (१०.४ टक्के), मटेरियल हँडलर (१० टक्के), मशीन ऑपरेटर (९.९ टक्के) आणि इलेक्ट्रिशियन (९.३ टक्के) या सर्वात वेगाने वाढ होत असलेल्या भूमिका आहेत, असेही त्यात म्हटले आहे.
"मेकॅनिक आणि मटेरियल हँडलरसारख्या भूमिकांमध्येही दुहेरी पगारवाढ दिसून आली आहे. आम्हाला हा बदल नियोक्त्यांसाठी नवीन वाढीसह भरती संरेखित करण्यासाठी आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी प्रासंगिकता आणि लवचिकतेच्या दिशेने कौशल्य वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा संकेताच्या स्वरुपात दिसतो," असे नारायण यांनी म्हटले आहे.
काही शहरातील काही पदांवर अपवादात्मक पगारवाढ अपेक्षित आहे. त्यात पुण्यात क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर (१३.८ टक्के), हैदराबादमध्ये एमआयएस एक्झिक्युटिव्ह (१३.४ टक्के), बंगळूरमध्ये डेटा इंजिनिअर (१२.९ टक्के), मुंबईत इलेक्ट्रिकल डिझाइन इंजिनिअर (१२.६ टक्के) आणि गुडगावमधील सेल्स एक्झिक्युटिव्ह (१२.४ टक्के) पदांचा समावेश आहे.