

राजू पाटील, नाशिक
यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला (जानेवारी व मे-ऑगस्ट २०२६ मध्ये) सोन्याने प्रति १० ग्रॅम १.६४ लाख रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. मात्र, इराण युध्द, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि नफावसुलीमुळे आता सोन्याचे भाव १.४३ ते १.४४ लाख रुपयांवर आले आहेत. उच्चांकी पातळीवरून जवळपास २५ टक्क्यांपर्यंतच्या घसरणीमुळे ग्राहकांना कमी किमतीत सोने खरेदीची सुवर्णसंधी मिळालेली आहे.
गत दिवाळीच्या तुलनेत सोन्याचे भाव किंचित जास्त असले, तरी मागील काही महिन्यांतील उच्चांकावरून झालेली घसरण ही बाजारात 'डिपमध्ये खरेदी' करण्याची उत्तम वेळ मानली जाते. सणासुदीचा आनंद घेताना खिशावर पडणारा ताण कमी झाला आहे. तसेच सोने दर घसरणीमागील दबावसुध्दा कमी होत आहे.
यंदाच्या दिवाळीपासून जूनपर्यंतचा काळ सोन्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आगामी ६ महिन्यांसाठी जगभरातील रिझर्व्ह बँकांची व्याजदर धोरणे, इराण युध्दामुळे निर्माण झालेली आर्थिक अनिश्चितता आणि लग्नसराई हे तीन महत्त्वाचे घटक सोन्याची आगामी वाटचाल निश्चित करणार आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक (फेडरल रिझर्व्ह) आगामी काळात व्याजदरांमध्ये काय निर्णय घेते, यावर सोन्याची चाल अवलंबून असेल. व्याजदर कपात झाल्यास सोन्याला जोरदार बूस्ट मिळू शकतो. सध्या व्याजदर उच्चांकी पातळीवर आले असून, एप्रिलपासून त्यात कपातीची शक्यता आहे. जगातील विविध भागांत सुरू असलेला भू-राजकीय तणाव आणि आर्थिक मंदीच्या शक्यतेमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी सातत्याने वाढत चालली आहे. भारतात आगामी महिने लग्नराईचे असल्यामुळे स्थानिक बाजारात दागिन्यांची मागणी वाढेल. त्यामुळे किमतींना बळकट आधार मिळेल. सध्याच्या गुंतागुंतीच्या जागतिक स्थितीचा विचार केल्यास टप्याटप्यात सोने खरेदीसाठी भारतीयांना सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे.
सोन्यामध्ये किती गुंतवणूक केली पाहिजे? हा सामान्य गुंतवणूकदारांना नेहमीच प्रश्न पडतो. कारण व्याज किंवा लाभांश कमावणाऱ्या कर्जरोखे किंवा समभागांप्रमाणे सोने स्वतःहून व्याजासारखा कोणताही परतावा देत नसतो. दरातील वाढ हाच मुख्य फायदा असतो. गुंतवणूकदारांकडे आधीपासून असलेले सोने, उद्दिष्टे आणि अस्थिरता पचविण्याची ताकद या तीन घटकांवर सोन्यात किती गुंतवणूक केली पाहिजे, हे अवलंबून असते. बहुतांश वैविध्यपूर्ण गुंतवणूकदारांसाठी, आर्थिक मालमत्तेच्या १० ते १५ टक्के गुंतवणूक सोन्यात करणे, ही योग्य रणनीती मानली जाते. एकरकमी गुंतवणूक करण्यापेक्षा गुंतवणूकदारांनी ६ ते १२ महिन्यांच्या कालावधीत सोन्यात गुंतवणूक टप्प्याटप्प्याने करणे अधिक फायदेशीर ठरणार आहे.
गिफ्ट सिटीच्या माध्यमातून सोने खरेदीचा पर्याय आता उपलब्ध आहे. गिफ्टसिटीत आंतरराष्ट्रीय किंमतीनुसार सोन्याची खरेदी केली जाते. २०२२ मध्ये सुरू झालेल्या इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज (आयआयबीएक्स) वर लंडन बुलियन मार्केट असोसिएशनच्या मापदंडांनुसार सोन्याचा आंतरराष्ट्रीय डॉलर किंमतींतच व्यवहार केला जातो आणि ते गिफ्टसिटीमध्ये विमाकवच असलेल्या तिजोऱ्यांमध्ये ठेवले जाते. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाच्या २०२६ मधील नव्या नियमांमुळे भारतातील फंड व्यवस्थापक आता गिफ्ट सिटीमधील सोन्यात अधिकृतपणे गुंतवणूक करू शकतात.
दीर्घकालीन दृष्टिकोन असलेल्या खरेदीदारांनी अद्यापही सोने बाजाराकडे पाठ फिरवलेली नाही. दर घसरत असताना २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीत मध्यवर्ती बँकांनी एकूण २८९ टन सोन्याची खरेदी केली. दुसऱ्या तिमाहीतील ही विक्रमी खरेदी ठरली. ही खरेदी प्रामुख्याने पोलंड आणि चीनने केली. आगामी वर्षात मध्यवर्ती बँकांकडून मजबूत मागणी राहील, अशी शक्यता जागतिक सुवर्ण परिषदेने वर्तवली आहे. भारतात सप्टेंबर महिन्यात सोने ईटीएफमध्ये ४४५१ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली. यंदाच्या वर्षातील आतापर्यंतची एकूण गुंतवणूक २०२५ मधील एकूण गुंतवणूकीपेक्षाही अधिक झाले, याकडे जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या अर्थ भारत इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स आयएफएससी या वित्तसंस्थेचे ग्रुप सीईओ सचिन सावरीकर यांनी लक्ष वेधले आहे. भारतीय गुतंवणूकदार, अनिवासी भारतीय, तसेच सोने खरेदी करणाऱ्या सामान्यांसाठी ही आनंदाची वार्ता होय.