

Gold Silver Price Today: धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सणासुदीच्या काळात बाजारात सोन्या-चांदीची मागणी वाढली असून, दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, सोन्याच्या दरात सलग पाचव्या दिवशी वाढ झाली आहे. गेल्या पाच दिवसांत २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमच्या किमतीत तब्बल ७ हजार १५० रुपयांची वाढ झाली आहे. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ६ हजार ५६० रुपयांनी महागले आहेत.
याआधी ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी सलग दोन दिवस सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. या दोन दिवसांत २४ कॅरेट सोन्याचे १० ग्रॅमचे दर ५ हजार ७० रुपयांनी, तर २२ कॅरेट सोन्याचे दर ४ हजार ६५० रुपयांनी कमी झाले होते. त्यानंतर काही दिवस दर स्थिर राहिले. मात्र, आता पुन्हा सोन्याच्या किमती वाढू लागल्या आहेत.
आज राजधानी दिल्लीत २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमच्या दरात प्रत्येकी १० रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली असून, एक किलो चांदी १०० रुपयांनी महागली आहे.
देशातील प्रमुख शहरांमध्ये १८, २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर वेगवेगळे आहेत. दिल्ली आणि मुंबईतील आजचे दर पुढीलप्रमाणे आहेत. मनीकंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार
दिल्ली
२४ कॅरेट सोने (१० ग्रॅम) : १,४६,१८० रुपये
२२ कॅरेट सोने (१० ग्रॅम) : १,३४,०१० रुपये
१८ कॅरेट सोने (१० ग्रॅम) : १,०९,६८० रुपये
मुंबई
२४ कॅरेट सोने (१० ग्रॅम) : १,४६,०३० रुपये
२२ कॅरेट सोने (१० ग्रॅम) : १,३३,८६० रुपये
१८ कॅरेट सोने (१० ग्रॅम) : १,०९,५३० रुपये
पुणे
२४ कॅरेट सोने (१० ग्रॅम) : १,४६,०३० रुपये
२२ कॅरेट सोने (१० ग्रॅम) : १,३३,८६० रुपये
१८ कॅरेट सोने (१० ग्रॅम) : १,०९,५३० रुपये
धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे. त्यामुळे बाजारातील मागणीचाही सोन्याच्या दरांवर परिणाम होत आहे.
सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही वाढ होत आहे. सलग चार दिवस चांदीचे दर स्थिर राहिल्यानंतर आता सलग दुसऱ्या दिवशी किमतीत वाढ झाली आहे.
२९ ते ३१ ऑक्टोबर या तीन दिवसांत एक किलो चांदीचे दर तब्बल २० हजार रुपयांनी घसरले होते. त्यानंतर चार दिवस दरांमध्ये कोणताही मोठा बदल झाला नाही. मात्र, गेल्या दोन दिवसांत चांदी पुन्हा १० हजार १०० रुपयांनी महागली आहे. आज दिल्लीत एक किलो चांदीचा दर १०० रुपयांनी वाढून २ लाख १० हजार १०० रुपयांवर पोहोचला आहे. मुंबई आणि पुण्यातही चांदी याच दराने विकली जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होत आहे. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांनंतर राजकीय परिस्थितीत झालेल्या बदलांमुळे पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या खाली आला आहे.
कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की महागाई वाढण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रीय बँका व्याजदर वाढवू शकतात. व्याजदर वाढल्यास सोन्यातील गुंतवणुकीचे आकर्षण कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव येतो.
मात्र, सध्या कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असल्याने महागाई वाढण्याची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे. यामुळे सोन्याच्या किमतींना आधार मिळत असल्याचे चित्र आहे.
एकीकडे धनत्रयोदशीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीची मागणी वाढली आहे, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही परिणाम दिसत आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता आहे.
नोंद: प्रत्यक्ष दागिने खरेदी करताना शहर, सराफा बाजार, जीएसटी आणि घडणावळीनुसार अंतिम किंमत बदलू शकते.