

Gold in Mobile Phones and SIM Cards: घरात पडून असलेले जुने मोबाईल, खराब झालेले फोन आणि वापरात नसलेले SIM कार्ड अनेकदा निरुपयोगी वाटतात. पण या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये थोड्याफार प्रमाणात सोन्याचा वापर झालेला असतो, हे तुम्हाला माहिती आहे का? त्यामुळेच जुने फोन जमा करून त्यातून सोनं काढून मोठी कमाई करता येते, अशा चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होत असतात.
मात्र, यात तथ्य असले तरी चित्र मात्र वेगळे आहे. एका-दोन जुन्या मोबाईलमधून किंवा काही SIM कार्डमधून सोनं काढून मोठे पैसे कमावता येतात, असा समज चुकीचा आहे. मोबाईलमध्ये सोनं असतं, पण त्याचे प्रमाण अत्यंत कमी असते.
मोबाईल फोनमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आणि विशेषतः प्रिंटेड सर्किट बोर्ड अर्थात PCBच्या काही भागांमध्ये सोन्याचा वापर केला जातो. सोन्याला गंज लागत नाही आणि ते विजेचे वहन चांगल्या प्रकारे करते. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील अतिशय लहान कनेक्शन आणि कॉन्टॅक्ट पॉइंट्समध्ये त्याचा उपयोग होतो.
म्हणजेच, फोनच्या आत मोठा सोन्याचा तुकडा लपवलेला नसतो. अत्यंत कमी प्रमाणात, विशिष्ट इलेक्ट्रॉनिक भागांमध्ये सोन्याचा वापर केलेला असतो.
2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात 1998 ते 2021 या कालावधीत तयार झालेल्या 45 मोबाईल फोनच्या PCBचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात स्मार्टफोनच्या PCBमध्ये सोन्याचे मध्यम प्रमाण सुमारे 428 ppm असल्याचे आढळले. जुन्या फीचर फोनच्या PCBमध्ये हे प्रमाण तुलनेने जास्त, म्हणजे सुमारे 1,244 ppm होते.
इतर काही अभ्यासांमध्ये मोबाईलच्या PCBमध्ये सोन्याचे प्रमाण साधारण 0.009 ते 0.017 टक्के आढळले आहे. ही प्रमाण खूपच कमी आहे. पण हजारो किंवा लाखो फोन एकत्र करून त्यांचा वैज्ञानिक पद्धतीने पुनर्वापर केल्यास हीच छोटी मात्रा मोठ्या प्रमाणात जमा होऊ शकते.
याचे उत्तर होय असे आहे. SIM कार्डवरील धातूच्या कॉन्टॅक्ट पॉइंट्सवर अत्यंत पातळ गोल्ड प्लेटिंग वापरली जाऊ शकते. या थरामुळे कॉन्टॅक्ट पॉइंट्सचे संरक्षण होते आणि इलेक्ट्रिकल कनेक्शन चांगले राहते.
पण येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. SIM कार्डवर असलेला सोन्याचा थर अत्यंत पातळ असतो. त्यामुळे एक किंवा दोन SIM कार्डमधून सोनं वेगळं करून त्याची विक्री करणे हा फायदेशीर व्यवसाय नाही.
सोशल मीडियावर SIM कार्डमधून सोनं काढून भरपूर पैसे मिळवण्याचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. मात्र, प्रत्यक्षात एवढ्या कमी प्रमाणातील सोन्यासाठी लागणारी प्रक्रिया, खर्च आणि मेहनत यांचा विचार केला तर हा मार्ग फायद्याचा नाही.
जुन्या मोबाईलमधील सोन्याचे खरे मूल्य ई-वेस्ट रिसायकलिंगमध्ये आहे. एक फोन उघडून फारसे काही मिळणार नाही, पण लाखो जुने फोन एकत्र जमा झाल्यानंतर त्यातील मौल्यवान धातूंचे प्रमाण मोठे होते.
अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण संस्थेच्या आकडेवारीनुसार, 10 लाख जुने मोबाईल फोन रिसायकल केल्यास सुमारे 75 पाउंड, म्हणजे जवळपास 34 किलोपर्यंत सोनं मिळू शकतं. याशिवाय तांबे, चांदी आणि पॅलेडियमसारख्या इतर मौल्यवान धातूही मिळू शकतात.
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की एका मोबाईलमध्ये सोन्याचे प्रमाण अत्यल्प असते. पण लाखो मोबाईलचा ई-कचरा एकत्र आल्यावर त्यातून मोठ्या प्रमाणात मौल्यवान धातू मिळू शकतात.
मोबाईल फोन, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील ई-कचऱ्यात सोन्यासह अनेक मौल्यवान धातू असतात. भारतातील ई-वेस्ट रिसायकलिंगकडे आता अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. NITI Aayogच्या एका अहवालात मोबाईल फोनच्या ई-कचऱ्यात काही मौल्यवान धातूंचे प्रमाण अधिक असू शकते, असे नमूद करण्यात आले आहे.
मोबाईल फोनच्या ई-वेस्टमध्ये प्रति टन सुमारे 300 ते 400 ग्रॅम सोन्याचे प्रमाण असू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे ई-कचऱ्याचा योग्य पद्धतीने पुनर्वापर करणे आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाचे ठरू शकते.
तांत्रिकदृष्ट्या ई-कचऱ्यातून सोनं वेगळं करता येते. पण ही प्रक्रिया घरच्या घरी करणे सुरक्षित किंवा सोपे नाही. औद्योगिक स्तरावर ई-कचऱ्याचे आधी वर्गीकरण केले जाते. त्यानंतर उपकरणांचे विविध भाग वेगळे केले जातात आणि विशिष्ट वैज्ञानिक प्रक्रियांच्या माध्यमातून धातू वेगळे केले जातात.
घरच्या घरी जुन्या मोबाईलचे PCB जाळणे किंवा रसायने आणि आम्लांचा वापर करून सोनं काढण्याचा प्रयत्न करणे धोकादायक ठरू शकते. अशा प्रक्रियेत विषारी धूर आणि घातक रसायने तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्यासह पर्यावरणालाही धोका निर्माण होऊ शकतो.
घरात जुने मोबाईल जमा झाले असतील तर त्यातील सोनं स्वतः काढण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ते अधिकृत ई-वेस्ट रिसायकलरकडे देणे हा चांगला पर्याय आहे. एकंदरीत, तुमच्या मोबाईल आणि SIM कार्डमध्ये सोन्याचा वापर झालेला असू शकतो, हे खरे आहे.
पण एका-दोन फोनमधून सोनं काढून भरपूर पैसे कमावता येतील, ही अपेक्षा वास्तववादी नाही. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील मौल्यवान धातूंचा खरा फायदा हजारो-लाखो उपकरणांचा वैज्ञानिक पद्धतीने पुनर्वापर केल्यानंतरच मिळतो. त्यामुळे घरात पडलेला जुना फोन म्हणजे थेट सोन्याची खाण नाही.