Gold Silver Price Crash: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! सोनं 62 हजारांनी स्वस्त, चांदीचे भावही कोसळले; आणखी घसरण होणार?

Gold Silver Price Crash: सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून, MCX वर सोन्याचा भाव 3,200 रुपयांनी तर चांदीचा भाव 5,900 रुपयांनी घसरला आहे.
Gold Silver Price Crash
Gold Silver Price CrashPudhari
Published on: 
Updated on: 

Gold Silver Price Crash: सोनं चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. बुधवारी देशांतर्गत वायदे बाजारात सोन्याचा भाव एका दिवसात तब्बल 3,200 रुपयांनी घसरला. तर चांदीच्या दरातही मोठी घट झाली. चांदीचा भाव एका दिवसात जवळपास 5,900 रुपयांनी कमी झाला. त्यामुळे बाजारात खळबळ उडाली आहे.

या घसरणीमागे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरांबाबतच्या भूमिकेचा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. डिसेंबरमधील बैठकीत अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजदर वाढवू शकते, अशी शक्यता काही अहवालांमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. भविष्यातही व्याजदर वाढण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीमधील गुंतवणूक कमी करण्यास सुरुवात केली आहे.

एमसीएक्सवर सोने-चांदीचे दर किती घसरले?

बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 3,200 रुपयांनी म्हणजेच 2.38 टक्क्यांनी घसरून 1,31,027 रुपयांवर आला. दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली. चांदीचा भाव किलोमागे 5,900 रुपयांनी म्हणजेच 3.47 टक्क्यांनी कमी होऊन 1,63,818 रुपयांवर पोहोचला.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांबाबत महत्त्वाचे संकेत मिळत असल्याने जागतिक बाजारातही सोने आणि चांदीवर दबाव निर्माण झाला आहे. व्याजदर वाढल्यास गुंतवणूकदारांचा कल रोखे आणि इतर व्याज देणाऱ्या गुंतवणूक पर्यायांकडे वाढू शकतो. त्यामुळे सोने आणि चांदीसारख्या मालमत्तांची मागणी कमी होण्याची शक्यता आहे.

सराफा बाजारातही सोन्याचे दर घसरले

केवळ वायदे बाजारातच नाही, तर देशातील सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या किमती कमी झाल्या आहेत. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 3,000 रुपयांनी घसरून 1,31,505 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

तर 22 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 2,900 रुपयांनी कमी होऊन 1,20,459 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 98,629 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

चांदीच्या दरातही मोठी घट झाली आहे. चांदीचा भाव किलोमागे 4,400 रुपयांनी घसरून 1,64,506 रुपयांवर आला आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत देशातील अनेक सराफा बाजारांमध्ये या घसरणीचा परिणाम दिसून येत आहे.

Gold Silver Price Crash
Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक झेप; ११ दिवसांत केला नवा विक्रम, किती कोटी कमावले?

सोनं 62 हजार रुपयांनी स्वस्त; चांदीही 2.57 लाखांनी घसरली

सोने आणि चांदीच्या दरात झालेली घसरण किती मोठी आहे, हे त्यांच्या विक्रमी किमतींवरून लक्षात येते. जानेवारी महिन्यात सोन्याचा भाव 1.93 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. मात्र, आता तो घसरून जवळपास 1.31 लाख रुपयांवर आला आहे. म्हणजेच सोन्याच्या दरात आतापर्यंत जवळपास 62 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

चांदीची परिस्थितीही काही वेगळी नाही. चांदीचा विक्रमी भाव 4.20 लाख रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला होता. मात्र, आता चांदीचा दर 1.63 लाख रुपयांच्या आसपास आला आहे. त्यामुळे चांदीच्या किमतीत जवळपास 2.57 लाख रुपयांची घसरण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठा फटका

जागतिक बाजारातही सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 2.15 टक्क्यांनी घसरून 3,780.40 डॉलर प्रति औंस झाला आहे. तर चांदीचा भाव 3.15 टक्क्यांनी कमी होऊन 45.865 डॉलर प्रति औंसवर आला आहे.

Gold Silver Price Crash
Javed Akhtar: 'हिंदुस्तानातील प्रत्येक व्यक्तीच्या रक्तात राम...', जावेद अख्तरांच्या विधानाने पेटला वाद; मौलाना संतापले, दिलं प्रत्युत्तर

सोने-चांदीचे दर आणखी घसरणार?

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांबाबत काय भूमिका घेतली जाते, यावर आगामी काळात सोने आणि चांदीच्या किमतींचे भाव ठरणार आहेत. व्याजदर वाढल्यास सोन्या-चांदीच्या मागणीवर दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर आणखी घसरू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मात्र, व्याजदरांबाबतचा अंतिम निर्णय, डॉलरची स्थिती, जागतिक आर्थिक घडामोडी आणि गुंतवणूकदारांची मागणी यावर पुढील दर ठरणार आहेत. त्यामुळे सोने किंवा चांदी खरेदी करण्यापूर्वी बाजारातील ताज्या किमती तपासणे महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.