

Gold and Silver Crash in 8 Days: गेल्या काही दिवसांत सराफा बाजारात प्रचंड उलथापालथ झाली आहे. गुंतवणूकदारांपासून सामान्य ग्राहकांपर्यंत सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, आता सोनं-चांदी घ्यावी का, की अजून भावात घसरण होण्याची वाट पाहावी?
2025 मध्ये सोनं आणि चांदीने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला होता. सोन्याने सुमारे 70 टक्के, तर चांदीने तब्बल 170 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला होता. त्यामुळे अनेकांना वाटत होतं की भाव आणखीन वाढतील. मात्र 2026च्या सुरुवातीलाच चित्र पूर्ण बदललं.
29 जानेवारी 2026 रोजी सोनं-चांदी ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर होतं. Multi Commodity Exchange of India (MCX) वर सोन्याचा भाव जवळपास 1.93 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला होता, तर चांदी थेट 4.20 लाख रुपये प्रतिकिलोवर गेली होती. कॉपरही 1480 रुपयांच्या आसपास ट्रेड करत होता. त्या वेळी अनेक गुंतवणूकदारांना वाटलं होतं की, आता भाव आणखी वाढतील.
पण 30 जानेवारीपासून बाजाराने अचानक यू-टर्न घेतला. सलग तीन दिवस जोरदार घसरण झाली. 2 फेब्रुवारीला थोडी वाढ झाली, पण ती फार काळ टिकली नाही. पुन्हा भाव खाली येऊ लागले.
फक्त आठ दिवसांत चित्र पूर्ण बदललं. उच्चांकावरून सोनं 1.93 लाखांवरून घसरत साधारण 1.40 लाखांच्या आसपास आलं. चांदीची अवस्था तर आणखी वाईट झाली. चांदी 4.20 लाखांवरून थेट 2.25 लाखांपर्यंत घसरली. म्हणजे चांदी जवळपास अर्ध्यावर आली.
शुक्रवारी बाजार बंद होताना सोनं सुमारे 1.55 लाख रुपये आणि चांदी 2.49 लाख रुपये प्रतिकिलो होती. टक्केवारीत पाहिलं तर सोन्यात जवळपास 23 टक्के, तर चांदीत तब्बल 46 टक्क्यांची घसरण झाली आहे. कॉपरमध्येही सुमारे 18 टक्क्यांची घसरण झाली आहे. ज्यांनी जास्त भाव असताना सोन्या चांदीची खरेदी केली होती, त्यांच्या पोर्टफोलिओला मोठा धक्का बसला आहे.
यामागे दोन मोठी कारणं सांगितली जात आहेत. पहिलं म्हणजे नफेखोरी. भाव प्रचंड वाढल्यानंतर जुन्या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू केली. त्यामुळे बाजारावर दबाव आला.
दुसरं आणि अधिक महत्त्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलर मजबूत होणं. डॉलर मजबूत झाला की लोक डॉलरमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे सोन्या चांदीची मागणी कमी होते.
याशिवाय Federal Reserve मध्ये नव्या प्रमुखाची नियुक्ती, तसेच MCX कडून ट्रेडिंग मार्जिन वाढवण्याचा निर्णय, या सगळ्यांमुळे बाजारात विक्रीचा जोर वाढला. मार्जिन वाढल्यामुळे लहान ट्रेडर्स आणि सट्टेबाजांना व्यवहार सुरू ठेवणं अवघड झालं आणि त्यांनीही माल विकायला सुरुवात केली.
बाजारातील तज्ज्ञांचं मत आहे की, सध्या घाईघाईने निर्णय घेणं टाळावं. JPMorgan Chase च्या विश्लेषकांनी सांगितलं की, चांदीचे भाव अजूनही तुलनेने जास्त आहेत आणि जागतिक तणाव वाढला, तर आणखी घसरण होऊ शकते.
तज्ज्ञांचा सल्ला आहे की, बाजार स्थिर होईपर्यंत थांबणं शहाणपणाचं ठरेल. गुंतवणूक करायचीच असेल, तर एकदम मोठी रक्कम टाकण्याऐवजी हळूहळू, टप्प्याटप्प्याने (SIPसारख्या पद्धतीने) गुंतवणूक करा. त्यामुळे भावांच्या चढ-उताराचा धोका बराच कमी होतो.
थोडक्यात सांगायचं झालं, तर सध्या सराफा बाजारात प्रचंड अस्थिरता आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना विचारपूर्वक आणि संयमाने निर्णय घेणंच योग्य आहे. तसेच गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.