Elon Musk: सर्व बँका बंद होणार; पैशांना किंमत राहणार नाही, माणसांना कामाची गरज नाही, इलॉन मस्क यांचा धक्कादायक दावा

Elon Musk AI Prediction: इलॉन मस्क यांच्या मते, भविष्यात AI आणि रोबोट्स सर्व कामे सांभाळतील आणि उत्पादन खर्च जवळपास शून्यावर जाईल.
Elon Musk AI Prediction
Elon Musk AI PredictionPudhari
Published on
Updated on

Elon Musk AI Prediction: कल्पना करा, तुम्हाला रोज कामावर जाण्याची गरज नाही, नोकरीची चिंता नाही आणि बाजारात मिळणाऱ्या बहुतांश वस्तू जवळपास मोफत उपलब्ध आहेत. तुमच्या खिशातील नोटा, नाणी किंवा बँक खात्यातील पैशांनाही काहीच किंमत उरलेली नाही. हे एखाद्या विज्ञानकथेतील दृश्य वाटत असले तरी जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि अलीकडेच ट्रिलेनियर बनलेले इलॉन मस्क यांनी हे स्पप्न अस्तित्वात येऊ शकतं असं सांगितलं आहे.

एका मुलाखतीत मस्क यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ह्यूमनॉइड रोबोट्समुळे जगाची अर्थव्यवस्था पूर्णपणे बदलून जाईल, असा दावा केला आहे. त्यांच्या मते, येत्या काळात रोबोट्स आणि एआय इतके सक्षम होतील की ते मानवांपेक्षा अधिक वेगाने आणि अचूकपणे सर्व कामे करू शकतील.

रोबोट्स करतील सर्व काम

मस्क यांच्या मते, कारखान्यांमध्ये उत्पादनापासून ते शेती, वाहतूक, आरोग्यसेवा आणि विविध सेवा क्षेत्रांपर्यंत जवळपास सर्व कामे रोबोट्सच्या हाती जातील. हे रोबोट्स दिवसाचे 24 तास, आठवड्याचे सातही दिवस कोणताही पगार, सुट्टी किंवा विश्रांती न घेता काम करू शकतील.

यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. आज कोणतीही वस्तू तयार करताना लागणारा सर्वात मोठा खर्च म्हणजे मानवी श्रम. जर तोच खर्च नाहीसा झाला, तर वस्तूंच्या किंमतीही झपाट्याने कमी होतील.

पैशांना किंमत राहणार नाही

आजच्या अर्थव्यवस्थेत वस्तूंची किंमत उत्पादन खर्च, वाहतूक, मजुरी आणि मागणी-पुरवठ्यावर अवलंबून असते. मात्र मस्क यांची कल्पना वेगळी आहे. त्यांच्या मते, एआय आणि रोबोट्समुळे उत्पादन इतक्या मोठ्या प्रमाणात वाढेल की वस्तूंची कमतरता भासणार नाही.

जेव्हा बाजारात सर्व काही भरपूर प्रमाणात उपलब्ध असेल आणि उत्पादन खर्च जवळपास शून्यावर जाईल, तेव्हा वस्तूंच्या किंमतीही शून्याच्या जवळ पोहोचतील. अशा परिस्थितीत पैशांचे महत्त्व नैसर्गिकरित्या कमी होईल.

Elon Musk AI Prediction
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? अमेरिका-इराण करारानंतर भारताला मोठा दिलासा; CNG दरही कमी होण्याची शक्यता

‘युनिव्हर्सल हाय इनकम’ म्हणजे काय?

पण जर लोक कामच करणार नसतील, तर त्यांना उत्पन्न कुठून मिळणार? याचे उत्तर देताना मस्क यांनी ‘युनिव्हर्सल हाय इनकम’ ही संकल्पना मांडली आहे.

सध्या जगभरात ‘युनिव्हर्सल बेसिक इनकम’वर चर्चा सुरू असते, ज्यामध्ये प्रत्येक नागरिकाला किमान आर्थिक मदत दिली जाते. मात्र मस्क यांच्या मते भविष्यात सरकार किंवा स्वयंचलित आर्थिक व्यवस्था प्रत्येक व्यक्तीला पुरेसे आणि सन्मानजनक उत्पन्न उपलब्ध करून देईल.

त्यामुळे लोकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही. ते आपला वेळ शिक्षण, संशोधन, कला, मनोरंजन किंवा वैयक्तिक विकासासाठी वापरू शकतील.

बँकांचे अस्तित्व धोक्यात?

जर व्यवहारांसाठी पैशांची गरजच उरली नाही, तर पारंपरिक बँकिंग व्यवस्थेवरही मोठा परिणाम होऊ शकतो. मस्क यांच्या मते, भविष्यात बँका, कर्जव्यवस्था आणि आर्थिक संस्थांचे स्वरूप पूर्णपणे बदलू शकते.

याबाबत अनेक अर्थतज्ज्ञ साशंक आहेत. त्यांचे म्हणणे आहे की जगातील अर्थव्यवस्था केवळ उत्पादन खर्चावर चालत नाही. संसाधने, मालकी हक्क, संपत्तीचे वितरण आणि सामाजिक असमानता यांसारखे अनेक घटकही महत्त्वाचे असतात.

Elon Musk AI Prediction
Strait of Hormuz: होर्मुझची सामुद्रधुनी सुरु झाल्यावर परिस्थिती पूर्ववत होण्यास किती महिने लागणार?

स्वप्न की वास्तव?

इलॉन मस्क यांचे हे विधान अनेकांना अतिशयोक्तीपूर्ण वाटू शकते. मात्र टेस्ला, स्पेसएक्स आणि एआय क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीमुळे त्यांच्या प्रत्येक वक्तव्याकडे जग गांभीर्याने पाहत आहे.

मस्क यांचा दावा खरा ठरेल की नाही, हे भविष्यातच स्पष्ट होईल. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्समुळे जगातील रोजगार, उद्योग आणि अर्थव्यवस्थेचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. आणि त्या बदलाची सुरुवात कदाचित आपण आत्ताच अनुभवत आहोत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news