

जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वेगाने प्रगती करत असून, भविष्यात अनेक नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक व जगप्रसिद्ध उद्योजक बिल गेट्स यांनी केलेले एक महत्त्वाचे विधान अनेकांना दिलासा देणारे ठरले आहे.
गेट्स यांच्या म्हणण्यानुसार, पुढील 100 वर्षांपर्यंतही काही क्षेत्रांतील नोकऱ्या एआय कधीच हिरावून घेऊ शकणार नाहीत.
बिल गेट्स यांनी स्पष्ट केले की कोडिंग, जीवशास्त्र आणि ऊर्जा क्षेत्रातील नोकऱ्या एआयच्या वाढत्या प्रभावानंतरही सुरक्षित राहतील. कारण या क्षेत्रांमध्ये मानवी सर्जनशीलता, संशोधनातील नावीन्य आणि संकट काळातील निर्णयक्षमता अत्यंत महत्त्वाची आहे.
गेट्स यांनी सांगितले की कोडिंग म्हणजे केवळ संगणकात कोड लिहिणे नव्हे. ती कठीण समस्यांचे समाधान शोधण्याची एक कला आहे. एआय मूलभूत कामात मदत करू शकते, पण सर्जनशील विचारसरणी व नव्या कल्पना मांडण्याची क्षमता फक्त मानवाकडेच आहे.
जीवशास्त्राच्या क्षेत्रात एआय डेटाचे विश्लेषण करून संशोधनाला गती देऊ शकते, पण नवे सिद्धांत मांडणे, नवीन औषध शोधणे किंवा आजारांवर उपाय शोधणे हे केवळ मानवी बुद्धीमत्तेच्या बळावरच शक्य आहे.
गेट्स यांनी ऊर्जा क्षेत्राचे उदाहरण देत सांगितले की एआय कार्यक्षमता वाढवू शकते; मात्र संकट काळातील निर्णय घेणे, भविष्यातील धोरणे आखणे आणि संसाधनांचा योग्य वापर करणे हे मानवाशिवाय शक्य नाही.
भारतामध्ये एआयमुळे मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात होताना दिसत आहे. अनेक अनुभवी कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागत आहे. मात्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ज्या क्षेत्रांमध्ये एआय पूरक साधन म्हणून वापरले जाते, तिथे मानवाला कायम महत्त्व राहणार आहे.
बिल गेट्स यांच्या या विधानामुळे आयटी, संशोधन आणि ऊर्जा क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.