

GST Benefits On Cars : टाटा कंपनीपाठोपाठ आता महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (एम अँड एम) ने ६ सप्टेंबरपासून त्यांच्या वाहनांच्या किमतीत घट करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) कपातीचा लाभ ग्राहकांना देण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महिंद्राच्या काही मॉडेल्सवर १.६ लाख रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे.
केंद्र सरकारने 1200 सीसी पर्यंत पेट्रोल इंजिन आणि 1 500 सीसी आणि आणि ४००० मिमीपेक्षा कमी लांबीच्या डिझेल वाहनांवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी एसयूव्ही (SUV) प्रकारातील वाहने तयार करते. यापूर्वी मोठ्या इंजिन क्षमतेच्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांवर जवळपास ५० टक्के प्रभावी कर लागत होता, ज्यात २८ टक्के जीएसटी आणि २२ टक्के भरपाई उपकर (compensation cess) समाविष्ट होता. नवीन नियमांनुसार, हा कर सपाट ४० टक्के करण्यात आला आहे.
बोलेरो/निओ : (१.२७ लाख)
XUV3XO (पेट्रोल): (१.४० लाख)
XUV3XO (डिझेल): (१.५६ लाख)
थार २डब्ल्यूडी (डिझेल): (१.३५ लाख)
थार ४डब्ल्यूडी (डिझेल): (१.०१ लाख)
स्कॉर्पिओ क्लासिक: (१.०१ लाख)
स्कॉर्पिओ-एन: (१.४५)
थार रॉक्स: (१.३३ लाख)
XUV700: (१.४३ लाख)
टाटा मोटर्सने शुक्रवारी (६ सप्टेंबर) एक मोठी घोषणा करत २२ सप्टेंबरपासून आपल्या प्रवासी वाहनांच्या किमतींमध्ये १.४५ लाख रुपयांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे. सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांसाठी हा एक मोठा दिलासा मानला जात आहे. काही दिवसांपूर्वीच जीएसटी परिषदेने वाहनांसह अनेक वस्तूंवरील करात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाबद्दल बोलताना टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र म्हणाले, "प्रवासी वाहनांवरील जीएसटीमध्ये २२ सप्टेंबर २०२५ पासून होणारी कपात एक दूरगामी आणि योग्य निर्णय आहे. यामुळे देशभरातील लाखो लोकांसाठी वैयक्तिक वाहन खरेदी करणे अधिक सोपे होईल. या निर्णयामुळे आमची लोकप्रिय वाहने आणि एसयूव्ही अधिक सुलभ बनतील, प्रथमच वाहन खरेदी करणाऱ्यांना मदत मिळेल आणि नवीन युगातील वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढेल."
कर्व्ह : (६५,००० )
टिआगो : (७५,०००)
टिगोर : (८०,००० )
पंच : (८५,०००) रुपयांपर्यंत
अल्ट्रॉझ : (१.१० लाख )
हॅरियर : (१.४० लाख )
सफारी :( १.४५ लाख)
नेक्सॉन : (१.५५ लाख)
"जीएसटीमधील दुसऱ्या पिढीतील या महत्त्वपूर्ण सुधारणेबद्दल आम्ही सरकारचे आभार मानतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. हा निर्णय भारताला अधिक मजबूत आणि लवचिक अर्थव्यवस्थेकडे घेऊन जाण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे सर्वसामान्य माणसाला फायदा होईलच, शिवाय बाजारातील आत्मविश्वास वाढेल. ग्राहकांचा कल सकारात्मक होईल आणि गुंतवणुकीलाही चालना मिळेल. यामुळे सर्वसामान्यांसाठी वाहनांची उपलब्धता आणि परवडणारी क्षमता वाढेल. संपूर्ण वाहन क्षेत्राच्या विकासालाही चालना मिळेल."
'टोयोटा'चे उप-व्यवस्थापकीय संचालक स्वप्नेश आर मारू
"जीएसटीमधील कपात ही आम्ही योग्य दिशेने टाकलेले पाऊल मानतो. ही कपात उद्योगाच्या वाढीस मदत करेल आणि बाजाराचा विस्तार करण्यास साहाय्य करेल. यामुळे पारदर्शकता वाढेल. इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EVs) कमी कर दर कायम ठेवण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे आमचे उत्पादन ग्राहकांसाठी अधिक सुलभ झाले आहे. अशा सुधारणांमुळे व्यावसायिक वातावरण स्थिर होण्यास मदत होते आणि सर्व भागधारकांना सर्वोत्तम शक्य प्रकारे फायदा होईल अशी रणनीती तयार करता येते."
'ऑडी इंडिया'चे प्रमुख बलबीर सिंग ढिल्लोन