GST 2.0 : कररचनेतील ऐतिहासिक बदल

GST 2.0 historic tax reforms
GST 2.0 : कररचनेतील ऐतिहासिक बदलPudhari File Photo
Published on
Updated on

सतीश डकरे, सीए

जीएसटी 2.0 विषयी प्रेस रीलिज आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न प्रकाशित झाले आहेत; परंतु सूचना किंवा परिपत्रके अद्याप प्रकाशित झालेली नाहीत. परंतु, यात काही गोष्टींचा उलगडा झालेला दिसत आहे.

प्रमुख बदल : करस्लॅबची पुनर्रचना

यापूर्वी जीएसटी अंतर्गत 3%, 5%, 12%, 18%, 28% आणि 40% असे सहा करस्लॅब अस्तित्वात होते. आता ही रचना साधी करून खालीलप्रमाणे करण्यात आली आहे -

3% : रत्ने आणि दागिने प्रकार वस्तूंवर कर.

5% : आवश्यक व दैनंदिन वस्तूंवर कर.

18% : बहुतेक वस्तू व सेवांसाठी मानक दर कर.

40% : विलासी व हानिकारक (‘डिमेरिट’) वस्तूंवर कर.

काय झाले स्वस्त?

दैनंदिन वापराच्या वस्तू : साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, शेव्हिंग क्रीम, केसांचे तेल, टूथब्रश यांसारख्या वस्तूंवरील करदर 18% वरून 5% झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाचा मासिक खर्च थेट कमी होणार आहे.

अन्नधान्य व दुग्धजन्य उत्पादने : लोणी, चीज, खजूर, पास्ता, नमकीन या पॅकेज्ड खाद्यपदार्थांवर आता फक्त 5% जीएसटी आकारला जाणार आहे. तसेच, णकढ दूध, पनीर, भारतीय पोळ्या/पराठे यांना जीएसटीमधून पूर्ण सूट देण्यात आली आहे.

आरोग्य व विमा क्षेत्र: जीवन विमा व आरोग्य विमा पॉलिसींना करातून पूर्ण सूट देण्यात आली आहे. थर्मामीटर, ग्लुकोमीटर, डायग्नॉस्टिक किटस्, ऑक्सिजन, चष्मे यांवरील जीएसटी फक्त 5% आहे. यामुळे मध्यमवर्गीय व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

शिक्षण क्षेत्र : शालेय साहित्य जसे की नोटबुक, पेन्सिल, खोडरबर, स्केल इत्यादींवरील जीएसटी रद्द (0%) झाला आहे.

उद्योग व शेती क्षेत्रासाठी बदल

कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था - ट्रॅक्टर, टायर, सिंचन यंत्रणा, बायो-पेस्टिसाईडस् यांवर केवळ 5% कर लागेल. शेतकर्‍यांना आधुनिक साधने स्वस्तात उपलब्ध होऊन उत्पादनक्षमता वाढेल.

बांधकाम वस्तू - सिमेंटवरील कर 28% वरून 18% झाला आहे. बांधकाम खर्च कमी होऊन घरखरेदी व पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती मिळेल.

इलेक्ट्रॉनिक्स व घरगुती उपकरणे - टीव्ही, एसी, डिशवॉशर यांवरील कर 28% वरून 18% करण्यात आला आहे.

मोटारगाडी उद्योग - लहान पेट्रोल (1200 सीसीपर्यंत), डिझेल (1500 सीसीपर्यंत) गाड्या, मोटारसायकली (350 सीसीपर्यंत), तीनचाकी वाहने यांवरील कर 28% वरून 18% झाला आहे. इलेक्ट्रिक वाहनांवरील कर 5% वर कायम आहे. यामुळे गाड्यांच्या किमती 5% ते 10% पर्यंत स्वस्त होऊन विक्रीत वाढ अपेक्षित आहे. यामुळे वाहन उद्योगातील विक्रीला चालना मिळेल.

घरगुती व टिकाऊ वस्तू - भांडी, सायकल, शिवणयंत्र, किचनवेअर यांवरील कर फक्त 5% करण्यात आला आहे.

सेवा क्षेत्र - सलून, जिम, योग केंद्र यांसारख्या सेवांवरील करदर 18% वरून 5% केला आहे.

काय झाले महाग?

विलासी व हानिकारक वस्तूंवर सरकारने नवीन 40% करस्लॅब लागू केला आहे. यात तंबाखू, गुटखा, पानमसाला, महागडी गाडी, स्पोर्टस् कार, शीतपेय व एरेटेड ड्रिंक्स, जुगार संबंधित सेवा यांचा समावेश आहे. सरकारने आरोग्यास हानिकारक व समाजावर विपरीत परिणाम करणार्‍या वस्तूंवरच हा उच्च कर लावला आहे.

या सुधारणांचे परिणाम

ग्राहकांना दिलासा - रोजच्या वस्तू स्वस्त झाल्यामुळे कुटुंबाच्या खर्चावर सकारात्मक परिणाम.

व्यवसायांना सुलभता - करस्लॅब कमी झाल्यामुळे गोंधळ व वाद कमी होतील.

राजस्व परिणाम - सरकारनुसार यामुळे साधारण 48,000 कोटींचा तात्पुरता महसूल परिणाम होऊ शकतो; परंतु वाढलेल्या खपामुळे तो भरून निघेल अशी अपेक्षा आहे.

कृषी व एमएसएमई यांना फायदा - शेतकरी व लघु उद्योगांसाठी उपकरणे व इनपुटस् स्वस्त झाल्यामुळे उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईल.

सामाजिक परिणाम

सामान्य नागरिकांच्या जीवनमानात थेट सुधारणा.

आरोग्य, शिक्षण व विमा क्षेत्रांतील करसवलतींमुळे सामाजिक सुरक्षेला चालना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news