Digital Awareness India | ‘डिजिटल सावधानता‌’ हवीच!

डिजिटल तंत्रज्ञान आर्थिक क्षेत्रात ‌‘फिनटेक‌’ माध्यमातून विस्तारत असून, भारताने यूपीआय पद्धतीने मोठी झेप घेतली आहे.
Digital Awareness India
‘डिजिटल सावधानता‌’ हवीच!(Pudhari File Photo)
Published on
Updated on
Summary

डिजिटल तंत्रज्ञानाने आर्थिक क्षेत्र विस्तारत असून, यूपीआय भारताने बँकिंग व्यवहार सुलभ, स्वस्त व तत्काळ करणे हे स्मार्टफोनसारख्या माध्यमातून सोयीचे केले आहे. मात्र, याचा डिजिटल फसवणुकीसाठी कुशलतेने वापर वाढला असून, यापासून सावधानता, सजगता बाळगत जागरूक असणे महत्त्वाचे ठरते.

डिजिटल सुरक्षा

डिजिटल स्कॅम आपल्याबाबत होऊ नये यासाठी अनोळखी, असुरक्षित वेबसाईट, लिंक कटाक्षाने टाळणे व त्यातून जर फसवणूक झाली, तर 1930 या सायबर क्राईम टोलफ्रीवर तक्रार देणे, असे आपण करू शकतो. यात जेवढ्या लवकर तक्रार द्याल, तेवढ्या लवकर आपले पैसे मिळू शकतात. हे मोठे आंतरराष्ट्रीय जाळे असल्याने डिजिटल सुरक्षा महत्त्वाचीच!

प्रा. डॉ. विजय ककडे

डिजिटल तंत्रज्ञान आर्थिक क्षेत्रात ‌‘फिनटेक‌’ माध्यमातून विस्तारत असून, भारताने यूपीआय पद्धतीने मोठी झेप घेतली आहे. स्मार्टफोनचा वापर बँकिंग व्यवहारासाठी सुलभ करणे, अहोरात्र (247) व स्वस्त आणि तत्काळ असल्याने त्याचा स्वीकार वाढत आहे. परंतु, याचा वापर अधिक कुशलतेने डिजिटल फसवणुकीसाठी होत असून, यामध्ये नवनव्या पद्धतीने लुबाडण्याचे प्रमाण वाढत आहे. या फसवणुकीपासून सावधानता, सजगता ठेवली नाही तर सर्व कमाई, बचत संपवली जाऊ शकते, अशा अति नुकसानीच्या टोकावर आपण सर्वजण आहोत.

सेबी आणि विविध वित्त संस्थांनी नुकताच जागतिक गुंतवणूकदार सप्ताह World Investors week 6 ते 12 ऑक्टोबर साजरा केला असून, त्याची मुख्य भूमिका डिजिटल सावधानता हीच आहे. डिजिटल फसवणुकीचे प्रकार समजून घेणे, त्यांची कार्यपद्धती समजून घेणे, त्यापासून सावध राहणे हे अत्यावश्यक आहे. यासाठी सध्या नव्याने पसरत असलेल्या क्रांतिकारी योजनेचे मायाजाल समजून घेऊ व तसेच आरटीओ घोटाळा किंवा लूट पद्धत, व्हॉटस्‌‍ॲपवर स्टेग्नॉग्राफीतून होणारी फसवणूक आपले बँक खाते रिकामे करू शकते, ते कसे हे पाहू. आता दिवाळीचा काळ हा फसवणुकीस विशेषत: ऑनलाईन मार्केटिंग फसवणुकीस वापरला जात असल्याने अधिक जागरूक असणे आवश्यक आहे.

डिजिटल अरेस्ट

डिजिटल तंत्राचा सर्वाधिक वापर आता डिजिटल अरेस्ट यातून फसवणुकीसाठी केला जात आहे. यात केवळ 1 वर्षात विविध ठिकाणाहून 4000 कोटींची फसवणूक झाली असून, यामध्ये ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त अधिकारी, महिला यांचा समावेश होतो. विशेष म्हणजे यात डॉक्टर, वकील, प्राध्यापक, इंजिनिअर असे उच्चशिक्षित आहेत. यांची कार्यपद्धती अत्यंत आक्रमक व शिस्तबद्ध, अभ्यासपूर्ण असते. साधारण उच्च उत्पन्न गटातील, परदेशी मुले असणारे, किमान 10 लाखांची माया असणारे शोधले जातात व नंतर प्रक्रिया सुरू केली जाते. प्रथम आपणास पोलिस स्टेशनवरून व्हिडीओ कॉल येतो. तुमच्या बँक खात्यातून देशविघातक कार्यासाठी, अमली पदार्थ व्यापारासाठी व्यवहार झाले असून, तत्काळ मुंबई पोलिस स्टेशनला हजर होण्याचा आदेश होतो. आपण घाबरतो. त्यानंतर लगेच दुसरा अधिकारी फोनवर येतो व आपण वयस्क असल्याने किंवा स्त्री असल्याने घरी डिजिटल ॲरेस्ट स्वीकारणेची सवलत दिली जाते. यात 24 तास आपला व्हिडीओ कॉल चालू ठेवायचा व कोणासही संपर्क साधावयाचा नाही, जर असे केले नाही तर तत्काळ अटक करण्याची धमकी देतात. आता तुमच्या खातेवर असणारी रक्कम रिझर्व्ह बँकेच्या खात्यात चौकशी पूर्ण होईपर्यंत ठेवण्यास सांगितले जाते. असे पैसे सातत्याने ट्रान्स्फर करत लूट करतात. पोलिसी आवाज, पोलिस ठाण्याचे वातावरण, बोलणारा अधिकारी हे सारे खरे वाटतात व डिजिटल अरेस्ट होते. असे प्रकार सर्व मोठ्या शहरांत होत असून, बँक अधिकारी, लष्करी अधिकारीसुद्धा फसले आहेत. यासाठी सर्वात चांगली खबरदारी ही न घाबरता कॉल बंद करून, तक्रार नोंदवणे हीच आहे.

एआयच्या वापरातून 21000 चे दरमहा 19,50,000 रु?

भारतीय कुटुंबांना आर्थिक स्थैर्य कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने निर्माण केलेल्या ट्रेडिंग पद्धतीने देण्याची ही योजना वित्तमंत्री निर्मला सीतारामन स्वतः सांगत असून, इन्फोसिसचे नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांनी हे तंत्र दिले आहे. याकरिता युनिटी फंडेक्स जीपीटी वापरले जाईल. या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी प्रथम आपले नाव, मोबाईल क्र. व

ई-मेल यातून नोंदणी सुरू होते. दुसऱ्या टप्प्यात आपणाशी एजंट संपर्क साधतात व www. proxtrend.com वर आधार क्रमांक, फोटो असे केवायसी पूर्ण करून 21000 भरावे लागतात. यानंतर सेटअप पूर्ण होतो व खाते सक्रिय होते. जागतिक वित्त बाजारात सातत्याने ट्रेड करून प्रतिदिन फायदा होतो व तोच तुम्हाला प्रत्येक दिवसाला सकाळी 10 वाजता खात्यावर दिसू लागतो. यातून कष्ट न करता महिना 19,50,000/- मिळू शकतात (?) अशी ही क्रांतिकारी योजना शुद्ध फसवणूक असून कोट्यवधीची गुंतवणूक झाल्याचा दावा केला जातो.

योजनेचे सत्य

ही योजना निर्मला सीतारामन यांची प्रतिमा, आवाज यांचा एआयने वापर करून गुंतवणुकीच्या नावे सर्वसामान्य लोकांना फसवण्यासाठी केली असून, निर्मला सीतारामन यांनी स्पष्टपणे फसवणूक असल्याचे म्हटले आहे.

Digital Awareness India
इमर्जन्सी फंड म्हणजे काय ? तो कसा उभारावा ?

कुरिअर फसवणूक

ऑनलाईन खरेदी ही आधुनिक जीवनपद्धतीची अविभाज्य भाग झाली आहे. जेव्हा अशा वस्तू घरपोहोच होतात, तेव्हा प्रथम आपण ऑर्डर केल्याप्रमाणे वस्तू आहे का, ते तपासून पाहतो. ज्या पॅकेजमधून ते कुरिअर मिळाले ते आपण कचऱ्यात टाकून देतो. तुम्ही फेकलेल्या रॅपरवर पत्ता, मोबाईल क्रमांक ही माहिती असते. त्याचा वापर करून दुसरे कुरिअर पाठवले जाते. हे आपण ऑर्डर केलेले नसल्याने आपण नाकारतो. तेव्हा कुरिअर देणारा ते कुरिअर आपण नाकारू शकता व त्यासाठी आपण कंपनीला मिसकॉल करा, असे सांगितले जाते. आपणही यातून सुटका म्हणून त्या क्रमांकाला मिस कॉल करतो. यानंतर आपले बँक खाते रिकामे होऊ लागते.

image-fallback
अर्थभान : क्रेडिट कार्डचा शुल्कमहिमा    

डीप फेक व मदतीचा कॉल

डीप फेक तंत्र वापरून एखाद्याचा चेहरा व आवाज दुसऱ्याच्या ठिकाणी वापरले जाते. व्हॉटस्‌‍ॲप कॉल वरून तुमचा मुलगा, मित्र, वडील किंवा जवळचे नातेवाईक आपण अडचणीत असून, आपला फोन व पैसे हरवले आहेत. त्यामुळे तत्काळ पैसे पाठवण्याची विनंती करतो. समोर प्रत्यक्ष आपला मुलगा, मुलगी अथवा जवळचे नातेवाईक असल्याने आपण हा मदतीचा कॉल खरा समजून पैसे पाठवतो व फसतो हे डीप फेक तंत्र अनेक ठिकाणी वापरून तुमची आक्षेपार्ह विधाने अथवा व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केले जाऊ शकते. स्टॅग्नोग्राफी तंत्र वापरून आपण यांना पाहिलंत का, अशीही फसवणूक केली जाते. आपण ते चित्र नीट पाहणेसाठी क्लिक केले तर त्यामागे असलेले सॉफ्टवेअर आपल्या न कळत सर्व महत्त्वाची माहिती घेऊ शकतो. असाच प्रकार लग्नपत्रिका पाठवूनही करतात. यासाठी कोणत्याही अनोळख्या लिंकला प्रतिसाद न देणे, हेच सुरक्षिततेचे साधन ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news