

Crude Oil Price Fall India: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत गेल्या 40 दिवसांत तब्बल 28 टक्क्यांची घसरण झाली आहे. तरीही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये इंधन स्वस्त कधी होणार, असा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे.
सध्या ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे 71.74 डॉलर प्रति बॅरल, तर WTI क्रूड 68.60 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. फेब्रुवारीअखेर अमेरिका-इराण संघर्ष सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती आता नीचांकी पातळीवर आल्या आहेत.
गेल्या आठवड्यात ब्रेंट आणि WTI या दोन्ही प्रकारच्या कच्च्या तेलाच्या किमतीतही किरकोळ घसरण झाली.
कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्यामागे अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या चर्चेतील सकारात्मक घडामोडी हे एक प्रमुख कारण मानले जात आहे. या चर्चेमुळे मध्य पूर्वेतील तणाव कमी होण्याची शक्यता निर्माण झाली असून, तेल पुरवठा सुरळीत राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, जागतिक स्तरावर तेलाचा पुरवठा सुरळीत सुरू असला तरी मागणीत अपेक्षित वाढ झालेली नाही. विशेषतः चीनकडून कच्च्या तेलाची खरेदी अजूनही मंदावलेली आहे. त्यामुळे तेलाच्या किमतींवर दबाव कायम आहे.
भारतात पेट्रोल-डिझेलचे दर केवळ आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीवर ठरत नाहीत. त्यात रुपयाचा डॉलरसमोरील विनिमय दर, वाहतूक खर्च, केंद्र आणि राज्य सरकारचे कर, रिफायनरीचा खर्च आणि तेल कंपन्यांचे व्यावसायिक निर्णय यांचाही मोठा वाटा असतो. यामुळे कच्चे तेल स्वस्त झाले तरी त्याचा फायदा ग्राहकांना मिळेलच, असे नाही.
देशात 25 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल 40 दिवस उलटूनही इंधनाच्या किमती स्थिर आहेत.
ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, सध्या कच्च्या तेलाच्या किमती कमी असल्या तरी तेल कंपन्या अद्याप 'वेट अँड वॉच' या भूमिकेत आहेत. त्यामुळे तातडीने दरकपात होण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे.
दिल्ली: पेट्रोल ₹102.12 | डिझेल ₹95.20
मुंबई: पेट्रोल ₹111.21 | डिझेल ₹97.83
कोलकाता: पेट्रोल ₹113.51 | डिझेल ₹99.82
चेन्नई: पेट्रोल ₹108.01 | डिझेल ₹99.66
हैदराबाद: पेट्रोल ₹115.73 | डिझेल ₹103.82
बेंगळुरू: पेट्रोल ₹110.89 | डिझेल ₹98.80
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुढील काही दिवस कमी राहिल्या, तर भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरकपातीची शक्यता वाढू शकते. मात्र त्याबाबत तेल कंपन्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.