

Check CIBIL Score with Aadhaar Card: कर्ज घ्यायचे असेल तर सर्वात अगोदर आपला CIBIL स्कोअर तपासला जातो. हा स्कोअर म्हणजे आपल्या क्रेडिट इतिहासाचा आरसा आहे. आपण पूर्वी घेतलेले कर्ज वेळेवर फेडले आहे का, क्रेडिट कार्डचा वापर कसा केला आहे, या सर्वांची नोंद यात असते. म्हणूनच कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी CIBIL स्कोअर काय आहे, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
अनेकांना असा प्रश्न पडतो की आधार कार्डवरुन CIBIL स्कोअर तपासता येईल का? कारण आज जवळजवळ प्रत्येक सरकारी-खाजगी सेवेत आधार कार्ड ओळखपत्र म्हणून वापरले जाते. पण महत्वाची गोष्ट अशी की, सध्या आधार कार्डाच्या मदतीने CIBIL स्कोअर तपासणे शक्य नाही. कारण तुमचे सर्व आर्थिक व्यवहार - कर्ज, EMI, उत्पन्नाशी संबंधित माहिती ही PAN कार्डाशी जोडलेली असते. त्यामुळे CIBIL स्कोअर तयार करताना PAN या एकाच दस्तऐवजाचा वापर केला जातो.
याचा अर्थ असा नाही की आधार कार्डाचा उपयोग CIBIL स्कोअर साठी होत नाही. जर आपण CIBILच्या वेबसाइटवर नोंदणी करत असाल तर ओळखपत्र म्हणून आधार नंबर मागितला जाऊ शकतो. पण फक्त आधार नंबर टाकून तुम्हाला CIBIL स्कोअर कळत नाही. CIBIL स्कोअर पाहण्यासाठी PAN कार्ड अनिवार्य आहे.
जर आपल्याला स्वखर्चाने किंवा मोफत आपला स्कोअर पाहायचा असेल, तर CIBILच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन काही माहिती भरावी लागते. खाते तयार केल्यानंतर OTP च्या आधारे लॉगिन करून मुख्य डॅशबोर्डवर पोहोचल्यानंतर तुमचा स्कोअर दिसतो. मात्र, येथे फक्त स्कोअर मोफत पाहता येतो. संपूर्ण क्रेडिट रिपोर्ट मिळवण्यासाठी काही पैसे भरावे लागतात. तसेच अनेक बँकिंग अॅप्स आणि फिनटेक प्लॅटफॉर्मही मोफत CIBIL स्कोअर दाखवतात, परंतु PAN कार्ड नंबर दिल्याशिवाय ते शक्य होत नाही.
थोडक्यात सांगायचे तर, आधार कार्ड केवळ ओळखपत्र आहे. आर्थिक संबंध नसल्यामुळे त्याद्वारे CIBIL स्कोअर तपासता येत नाही. म्हणून लोन घेण्या अगोदर आपले PAN कार्ड सोबत ठेवणे आणि वेळोवेळी स्वतःचा स्कोअर तपासत राहणे महत्त्वाचे आहे.